सोलापूर : यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले असून, राज्यातील इतर जिल्ह्यांत साखर कारखाने सुरू असले, तरी सोलापूर विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील १६ साखर कारखाने बंद झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात याहीपेक्षा अधिक कारखाने उसाअभावी बंद झाले आहेत. मात्र, त्यांनी अद्याप साखर आयुक्त कार्यालयाला कळविले नसल्याचे सांगण्यात आले.
मागील वर्षी पाऊस कमी असल्याचा फटका प्रामुख्याने ऊस क्षेत्राला व सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांना बसल्याचे ऊस गाळपावरून दिसत आहे. राज्यातच यंदा साखर कारखाने १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली.
विधानसभा निवडणूक व दिवाळीच्या सणामुळे ऊसतोड मजूर आले नाहीत. पर्यायाने साखर कारखाने उशिराने सरू झाले. सोलापूर जिल्ह्यात काही साखर कारखान्यांचा अपवाद सोडला तर बरेच साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालले नाहीत.
ऊस तोडणी यंत्रणा अपुरी असल्याचे यामागे कारण होते. उशिराने सुरू झालेले साखर कारखाने पूर्ण क्षमतेने न चालताही जानेवारीपासून ऊसाअभावी बंद करावे लागल्याचे साखर कारखान्यांकडून सांगण्यात आले.
राज्यात सुरू झालेल्या २०० साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखाने बंद झाले असून, त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील एक, सोलापूर जिल्ह्यातील १२ व धाराशिवचे तीन साखर कारखाने आहेत. प्रत्यक्षात सोलापूर जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा पट्टा पडला असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात ऊस गाळपात पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे ऊस गाळप आतापर्यंत २५ लाख मेट्रिक टन झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील गाळप २४ लाख ७० हजार मेट्रिक टन झाले आहे.
यांचा पडला पट्टा१ शंकर सहकारी, अकलूज, भीमा टाकळी सिकंदर, धाराशिव (सांगोला), सहकार शिरोमणी वसंतराव काळे, पंढरपूर, लोकनेते बाबुराव आण्णा पाटील, अनगर, सिद्धनाथ शुगर, तिर्हे, इंद्रेश्वर शुगर, बार्शी, जकराया शुगर, येडेश्वरी बार्शी, मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट, युटोपियन शुगर, भैरवनाथ शुगर, आलेगाव, भैरवनाथ शुगर, लवंगी, लोकमंगल बीबीदारफळ (सर्व सोलापूर) तर भैरवनाथ शुगर (तेरणा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भैरवनाथ शुगर, सोनारी या धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांचा पट्टा पडला आहे.