बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : दुष्काळाचे सावट डोक्यावर असताना तालुक्यातील मांडवगण परिसरातील बांगर्डे येथील युवा शेतकरी बलभीम शेळके व नितीन जाधव यांनी कमी पाण्यावर नियोजन करत पिकविलेल्या रंगीत खरबुजांचा स्वाद रमजान ईदनिमित्त दुबईत दरवळला आहे.
तालुक्यातील बांगर्डे गाव हे अत्यंत दुष्काळग्रस्त आहे. येथे उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळणेही कठीण होते. अशा दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेळके व जाधव यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोगशील शेती केली.
या दोघांनीही प्रत्येकी दोन एकर क्षेत्रात कृषी सहायक प्रकाश मुळे व कृषीतज्ज्ञ शैलेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यातक्षम रंगीत खरबूज पिकाची लागवड केली.
खते, पाणी, औषधे आदींचे समीकरण जुळवले आणि रंगीत खरबुजाची शेती यशस्वी केली. प्रकाश मुळे यांनी कृषी क्रांती नैसर्गिक शेतकरी गटाची स्थापना केली.
या माध्यमातून मार्केटिंग व जैविक शेती, जैविक खते व औषधे उपलब्ध करून दिले. तसेच कमी खर्चात कसे पीक काढता येईल, याचे नियोजन करत खरबूज पिकविणाऱ्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या माध्यमातून परिसरातील अजय गवांदे, संजय रोडे, ओंकार पाचपुते, जगन्नाथ वागस्कर यांनी खरबुजाची शेती केली.
खरबूज शेतीतून दुष्काळग्रस्त परिस्थितीत अवघ्या २० दिवसांत उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांना अडीच ते तीन लाखांचा नफा मिळाला आहे. हा नफा कृषी विभागाने मदत केल्याने काही प्रमाणात वाढला. शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने शेतकरी केली तर निश्चित पिकांचा दर्जा सुधारतो व उत्पादन खर्च कमी होतो. - शैलेशकुमार ढवळे, सेंद्रिय शेती तज्ज्ञ
तरुणांनी एकत्र येऊन शेतकरी गट स्थापन करावेत व नैसर्गिक, सेंद्रिय शेती करावी. रासायनिक खताचा व औषधांचा वापर अत्यंत कमी करावा. म्हणजे निर्यात चाचणीत अशी फळे, भाजीपाला निवडले जातात. त्यातून शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यास मदत होते. - शशिकांत गांगर्डे, तालुका कृषी अधिकारी
अधिक वाचा: राज्यातील या १५ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश; साखर विकून पैसे देणार?