Join us

Paddy And Ragi Crop Subsidy : 'त्यां'ना दिले मग आम्हाला का अनुदानातून वगळले? भात अन् नाचणी उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:33 AM

शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादकांना अनुदान जाहीर केले असले तरी रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीक भात व दुय्यम पीक नाचणीला अनुदानातून वगळले आहे.

शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादकांना अनुदान जाहीर केले असले तरी रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीकभात व दुय्यम पीक नाचणीला अनुदानातून वगळले आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम पिकांवर होत असून, दिवसेंदिवस उत्पादकता खालावत आहे. यासाठी शासनातर्फे खरीप हंगामासाठी फळपीक विमा योजना राबविण्यात येते. मात्र, नुकसान भरपाई देताना भाताचे उंबरठा उत्पन्न निश्चित केले जाते.

भाताचे उंबरठा उत्पादन जास्त असल्यामुळे खरिपातील पीक विम्यापासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहात आहेत. अन्य जिल्ह्यातील पिकांसाठी अनुदान देण्यात येते. मात्र, कोकणातील भात, नाचणी पिकाला दरवर्षी वगळले जाते.

जिल्ह्यात भात पीक काही ठिकाणी कापणीसाठी तयार झाले असून, काही ठिकाणी तयार होण्याच्या मार्गावर आहे. पावसामुळे हळवे भात कापणीसाठी अडथळा येत आहे.

२०२३ मध्ये जिल्ह्यात किती पेरा?

भात : जिल्ह्यात एकूण ६८ हजार ८८.३७ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. भात हे मुख्य पीक आहे, लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. नुकसान, अनुदानासाठी उत्पन्नाची अट ग्राह्य धरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते.

नाचणी : नाचणी पिकाला दुय्यम पीक मानले जात असून, एकूण १० हजार ३९८.२१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. शासनाने भातासह नाचणी पिकाला अनुदानातून वगळले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान होते.

८० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

भात, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळा, ऊस अशा विविध पिकांची लागवड जिल्ह्यात करण्यात येते. खरीप हंगामात एकूण ७९ हजार ९१३. ३१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात येते.

म्हणून ई-पीक अॅपवर नोंदणी आवश्यक

शासनाकडून विविध पिकांसाठी मिळणारे अनुदान, नुकसान भरपाई, पीक विमा या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ई-पीक अॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना 'ई-पीक पाहणी अॅप'च्या माध्यमातून 'ई-पीक पाहणी' करण्याची सूचना केली होती. पीक विमा, कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाईसाठी 'ई-पीक पाहणी' आवश्यक आहे. - अजय शेंडे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

हेही वाचा :  Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

टॅग्स :कृषी योजनाशेतकरीशेतीभातपीकरत्नागिरीशेती क्षेत्रसरकार