वसई तालुक्यात दोन दिवस ढगाळ वातावरण असताना पाऊस पडेल अशी शक्यता होती, पण पावसाने विश्रांती घेतल्याने भातशेती संकटात सापडली आहे. पाऊस न पडल्यास भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतात लावणी केलेल्या भात रोपांची वाढ होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गेले चार-पाच दिवस पावसाने दडी मारल्याने पीक संकटात आले आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर खोडकिडा किंवा तुडतुड्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पावसाने चार-पाच दिवसांपासून दडी मारल्याने कडक उन्ह पडत आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच भात पिकाला आवश्यक असणारा असा समाधानकारक पाऊस पडत होता. त्यामुळे भातशेती बहरली होती. मात्र गेल्या चारपाच दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने व कडक उन्हामुळे शेतातील साचलेले पाणीही सुकून गेले आहे. त्यामुळे शेतात तडे जाऊ लागले आहेत. भातपिक तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने भात पिके कोमेजून जाऊ लागली आहेत.
तर भरत नाही भाताची लोंबी
पावसाअभावी भातशेती संकटात येऊ शकते. त्यामुळे खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यास भाताचे पाते पिवळे, लालसर होऊन त्याची सुरळी तयार होते. पाते सहज ओढले तरी उपटून हातात येते. त्याच्या बुंध्याकडील भागात कुजल्यासारखे, कुरतडल्यासारखे दिसते. दाणे भरण्याच्या अवस्थेत खोडकीड पडली तर भाताची लोंबी भरत नाही. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते.
जोरदार पावसाची अपेक्षा
सध्या बदललेल्या हवामानामुळे भातपिकावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांनी सहकारी सेवा सोसायटी व इतर ठिकाणांहून कर्ज काढून भातशेती लावली आहे. महागडी बियाणे, खते, मजुरीचा खर्च, लागवडीचा खर्च करून या पिकांची लागवड केली आहे. भात रोपांची बऱ्यापैकी वाढ झाल्याने त्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
भात पिकातील रोगांची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन
सध्याच्या परिस्थितीत शेतीला पावसाची गरज असून भाताच्या लोंबीमध्ये दाणा होण्याच्या प्रक्रियेअगोदर पाण्याची नितांत आवश्यकता आहे; मात्र ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने भाताचा दाणा कितपत भरेल, अशी शंका शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.