Join us

परतीच्या पावसामुळे दाणादाण भातशेती पाण्यात; सुगी लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:10 AM

परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक भातशेती पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पिके तयार असली तरी कापणीत पावसाचा अडथळा कायम आहे.

अलिबाग : परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक भातशेती पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पिके तयार असली तरी कापणीत पावसाचा अडथळा कायम आहे.

गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात दाणादाण उडवली. शेतात पाणी साचल्याने भातपीक काळे पडून कुजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

काही पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक भातशेती करण्यात येते. अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात भात पेरणी करतात. त्यामुळे लावणी जुलै महिन्यात सुरू होते. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कणसे येऊन नोव्हेंबरच्या शेवटी भात कापणी होते.

यंदा जूनमध्ये भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जुलैमधील मोठ्या प्रमाणात बरसलेल्या पावसाचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात भातशेती कुजली होती. तरीही त्यातून सावरलेली भातशेती चांगली होती.

मात्र, परतीच्या पावसाचा जोर येत्या काळात वाढला तर पुन्हा शेतीवर अस्मानी संकटाचे सावट येईल, अशी भीती असल्याने शेतकरी चिंतित आहेत. दरम्यान, सरकार आणि प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी होत आहे.

भातपीक तयारजिल्ह्यात सुमारे ९५ हजार हेक्टरवर यंदा भात लागवड करण्यात आली. हे पीक २० दिवसांपूर्वीच तयार होण्यास सुरुवात झाली. मात्र, पावसामुळे कापणी करता आली नाही. परतीच्या पावसाने ते मोठ्या प्रमाणात आडवे झाले आहे. आताच्या घडीला सुमारे ७५ टक्के भातपीक तयार आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणे खरेदी करून भाताची लागवड केली होती. सुरुवातीच्या पावसामुळे भात पीक चांगले तयार झाले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे पीक आडवे झाले आहे. भाताच्या दाण्याला मोड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भात उत्पादनावर परिणाम होणार असून, शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. - संदीप कदम, शेतकरी

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे ३५ टक्के भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे अर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये यासाठी भातपिकाचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. पंचनामे पूर्ण होताच कार्यवाहीसाठी पुढे पाठविण्यात येणार आहेत. - वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :भातपीकशेतकरीपाऊसशेतीसरकारअलिबाग