नाशिक : परतीचा पाऊस माघारी फिरल्यानंतर भात सोंगणीला (Paddy Harvesting) वेग आला आहे. ऐन दिवाळीतही कामे सुरू आहेत. मात्र मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. साधारण 500 ते 600 रुपये देऊनही मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे (October rain) भात पिकाचे मोठे नुकसान झालं. यानंतर अधिक नुकसान होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी लागलीच भात कापणीला सुरुवात केली. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ, सुरगाणा आदी आदिवासी पट्ट्यात भात सोंगणीची कामे सुरू आहेत. दिवाळीतही (diwali) भात उत्पादक शेतकरी शेत शिवारातच पाहायला मिळत आहेत, असे असताना मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. इतर वेळी 300 ते 400 रुपये असणारी मजुरी आजमितीस 500 ते 600 रुपयांवर येऊन पोहोचली आहे.
एकीकडे दिवाळी दुसरीकडे इतरही शेतकऱ्यांची भात कापणी, टोमॅटोची बांधणी, फवारणी सुरू असल्याने मजुरांची टंचाई आहे. त्यातच नाशिक तालुक्यातील गिरणारे पट्टा हा मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. सद्यस्थितीत शेतीची कामे सुरू असल्याने आजूबाजूच्या परिसरातील मजूर थेट या शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने स्थानिक गावात मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावातच जास्तीचा दर देऊनही मजूर मिळत नसल्याने भात सोंगणी कासव गतीने सुरू आहे.
भात सोंगणीला रोज वाढला!
इतर दिवशी महिलांना 300 रुपये तर पुरुषांना 400 रुपये रोज असतो. मात्र दिवाळीत हा रोज 500 ते 600 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे इतका रोज देऊनही मजूर मिळेल असे झाले आहे. त्यामुळे ऐन भात सोंगणीच्या वेळेला मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.