रत्नागिरी: चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या 'रत्नागिरी ८' (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांना लागली आहे.
राष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली ही जात असल्यामुळे देशातील काही खासगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने 'रत्नागिरी ८' या जातीचे बियाणे तयार करून अन्य राज्यांत त्याची विक्री करत आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत यावर्षीच्या हंगामात १५० टन बियाण्याची विक्री करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील शिरगाव भात संशोधन केंद्रातर्फे 'सुवर्णा' या जातीला पर्याय म्हणून २०१९ साली 'रत्नागिरी ८' हे वाण विकसित केले होते. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे.
वाणाची खाशियात- गेल्या तीन-चार वर्षांत या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगड ओडिशा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्येही पसंती मिळाली आहे.- 'रत्नागिरी ८' हे भात पीक १३५ ते १४० दिवसांत तयार होते.- भात पीक मध्यम उंचीचे असल्यामुळे जमिनीवर लोळत नाही.- करपा किंवा कडा करपा या रोगाला प्रतिकारक. - वेळेवर पेरणी व लावणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
प्रति हेक्टरी ८५ ते ९० क्विंटल उत्पन्नएक हजार दाण्यांचे वजन १६ ते १७ ग्रॅम आहे. या जातीचे विद्यापीठ स्तरावरील सरासरी उत्पन्न प्रति हेक्टर ५५ ते ६० क्विंटल एवढे असले, तरी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर ८५ ते ९० क्विंटल उत्पन्न घेतले आहे.
गतवर्षी साठ टन विक्रीबदलत्या हवामानात टिकणारी ही योग्य जात असून, उशिरा पडणाऱ्या पावसाचा याला फटका बसत नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील प्रत्येक तालुक्यात या बियाण्याची लागवड केली जात आहे. सन २०२३ च्या हंगामात रत्नागिरी व फोंडा केंद्रावर मिळून ६० टन बियाणे उपलब्ध केले होते.
कृषी विद्यापीठ अंतर्गत शिरगाव भात संशोधन केंद्राला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. आत्तापर्यंत भाताच्या अकरा जाती व एक संकरीत जात विकसित केली आहे. 'रत्नागिरी १' हे वाण जुने असून, अमेरिका, दक्षिण आफ्रिकेत या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे. आता 'रत्नागिरी ८' या वाणाला परराज्यातही पसंती मिळाली आहे. - डॉ. विजय दळवी, प्रभारी संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी
अधिक वाचा: Paddy Sowing धान लागवडीसाठी किती बियाणे लागते व कशी करावी बीजप्रक्रिया