Padegaon Sugarcane Research Centre : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथून विकसीत करण्यात आलेल्या ऊस वाणांचे देशातील व राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारीच्या भरभराटीसाठी फार मोठे योगदान आहे. सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत दिवसेंदिवस कमी होणारी ऊस पिकाची उत्पादकता व साखर उतारा ही फार मोठी समस्या आहे. या अनुषंगाने हवामान बदलाच्या परीस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने नवनवीन उत्कृष्ट ऊस वाण निर्मितीची दैदिप्यमान व उज्वल परंपरा कायम राखली आहे.
या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथून नव्याने प्रसारीत झालेल्या ऊसाच्या सुधारित वाणांची तांत्रिक माहिती होणे करिता शुक्रवार दि. ०३ जानेवारी, २०२५ रोजी "ऊसाच्या नवीन सुधारीत वाणाची ओळख" या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट मुख्य कार्यालय, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
एक दिवसीय चर्चासत्र मा. कर्नल डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मा. डॉ. कुणाल खेमनार, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून या चर्चासत्रासाठी श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे, चेअरमन, मा. श्री. पुरुषोत्तम जगताप, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. डॉ. राजेंद्र सरकाळे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे, संशोधन संचालक, मा. डॉ. विठ्ठल शिर्के तसेच मा.श्री. अजित चौगुले, कार्यकारी संचालक, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), पुणे हेही उपस्थितीत राहणार आहेत.
सदरील चर्चासत्र दोन सत्रात संपन्न होणार असून सकाळच्या सत्रात सकाळी ९.०० ते दुपारी १२.३० या वेळेत नवीन वाणाचे बियाणे प्रक्षेत्र आणि ऊस रोपवाटिका भेट होणार आहे. दुपारच्या तांत्रिक सत्रामध्ये १.३० ते ३.३० या वेळेत ऊसाच्या नवीन सुधारीत वाणांची ओळख या विषयी डॉ. राजेंद्र मिलारे, ऊस विशेषज्ञ, मऊसंकें, पाडेगाव यांचे सादरीकरण व नवीन वाणाबाबत असलेल्या शंका समाधान या विषयी सखोल चर्चा होणार आहे.
या चर्चासत्रात महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे सन्माननीय कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी व ऊस विकास अधिकारी यांनी सहभाग घेवून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथून नव्याने प्रसारित करण्यात आलेल्या फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७ व फुले ऊस १५००६ या सुधारित नवीन वाणांचे महत्व व गुणवैशिष्टये बाबत सखोल व सविस्तर माहिती घ्यावी असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, मा. कर्नल डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे.