मान्सूलला तीन आठवड्यांचा विलंब लागला तरी जुलैमध्ये दमदार कमबॅक केल्याने तब्बल ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या बाधित पिकांचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये ७२,०७२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान व ५२ हेक्टरमधील पिके खरडून गेल्याने २४.३८ लाख, अशी एकूण ७४.६४ कोटींची मागणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी शासनाकडे केली.
जिल्ह्यात ५ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरु झाली. यामध्ये सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. ३३ टक्क्यांवर बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, प्रपत्र अहवालास कृषी विभागाकडून एक आठवड्याचा विलंब झाला. अमरावती जिल्ह्यापेक्षा जास्त बाधित यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यासह अकोला व वाशिम जिल्ह्यातील बाधित पिकांसाठी शासन निधीच्या मागणीचा प्रस्ताव येथील विभागीय कार्यालयास आठ दिवसांपूर्वी सादर झालेला असतांना अमरावती जिल्ह्यास विलंब झाल्याने विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देखील दिल्याची माहिती आहे.
अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून सर्वाधिक ५३ कोटींचे नुकसान जिरायती पिकांचे झालेले आहे. याशिवाय बागायती पिकांचे ६२.२८ लाख तर फळपिकांचे २०.६१ कोटींचे नुकसान झाल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आहे. विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. आता शासन मदतीची प्रतीक्षा आहे.
३३ टक्क्यांवर नुकसान क्षेत्र, निधीची मागणी (रु./हे.)
पिकाचा प्रकार | जिरायती पिके | बागायती पिके | फळपिके | एकूण |
---|---|---|---|---|
बाधित शेतकरी | ८५७०१ | ५१० | ९३३० | ९५५४१ |
क्षेत्र बाधित | ६२५४३ | ३६६ | ९१६४ | ७२०७२ |
अपेक्षित निधी | ५३१६०९३८० | ६२२८४६० | ६२२८४६० | २०६१९३६०० |
जिरायती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान
अतिवृष्टीने ८५७०१ शेतकऱ्यांच्या ६२५४२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यासाठी ५३.१६ कोटींची शासनाकडे मागणी करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुक्यात ५.१५ कोटी, भातकुली २.२५ कोटी, चांदूर रेल्वे ३.६७ कोटी, नांदगाव २१.८८ कोटी, मोर्शी ७.३१ कोटी, चांदूरबाजार ११.७९ कोटी, चिखलदरा १ कोटी व धामणगाव तालुक्यासाठी ९९.६३ लाखांची मागणी करण्यात आली आहे.
वरुड तालुक्यात ५२ हेक्टरमधील शेती खरडली
जुलै महिन्यात आलेल्या पुरामूळे ५१.८९ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. यासाठी ४७ हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे २४.३९ लाखांची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. याशिवाय मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यातील ३६७ हेक्टरमधील हेक्टरमधील बागायती पिकांचे नुकसान झाले. यासाठी ६२.२८ लाखांची मागणी करण्यात आलेली आहे.