पंढरपूर : मागील वर्षभरात बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ३७० कोटी रुपयांची, डाळिंब ८० कोटी, फळे व भाजीपाला ३६ कोटी रुपये, भुसार धान्य २१ कोटी रुपये, कांदा १२ कोटी रुपये, जनावरे ५ कोटी रुपये, केळी ३ कोटी रुपये, वैरण १ कोटी अशी एकूण वार्षिक उलाढाल ५२८ कोटी रुपयांची झाली. शेतकरी हित नजरेसमोर ठेऊन या बाजार समितीची वाटचाल असून वरचेवर बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असल्याचे सभापती हरीष गायकवाड यांनी सांगितले.
पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभेत गायकवाड बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, सोमनाथ डोंबे, विनीत बाफना, संजय मस्के, धनंजय गाडेकर, अशोक शिंदे, सचिन गंगथडे, राहुल देवकर, राजकुमार फडे, प्रो. अनिलकुमार फडे उपस्थित होते. या उलाढालीमधून ४.४० रुपयांचे कोटी उत्पन्न बाजार समितीस मिळालेले आहे.
बाजार समितीने शॉपिंग सेंटर गाळे, आडत व्यापारी गाळे, सौदे कामकाज करिता सेलहॉल, स्वच्छतागृहाची सोय, पिण्याचे पाण्यासाठी आर.ओ. प्लॅन्ट, बाजार आवार वॉल कंपाउंड, ६० मे. टन वजनकाटा इत्यादी विविध विकास कामे केलेली असून बाजार आवारात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, फळे व भाजीपाला मार्केटसाठीचे गाळे, डाळिंब मार्केट करिता काँक्रीटीकरण करणे कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा पुतळा उभारणी करणे, सौरऊज प्रकल्प, रस्ते, शॉपिंग सेंटरचे वरील मजल्याचे बांधकाम, शेतकरी भवन पेट्रोल पंप. इत्यादी कामे असल्याचे सांगितले.
स्वागत उपसभापती राजूबा गावडे यांनी केले. अहवाल वाचन सचिव कुमार घोडके यांनी केले. सूत्रसंचालन लेखापाल गजेंद्र जोशी यांनी केले.
हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी