Join us

कृषी विकासासाठी पाणी फाउंडेशन व कृषी विद्यापीठ यांचे ऋणानुबंध शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 12:00 PM

शिवार फेरीसाठी कृषी विद्यापीठात जमला शेतकरी मेळावा. दुसऱ्या दिवशी तब्बल 40 हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू भगिनींनी जाणून घेतले आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती

अकोला  :

तीन दिवसीय शिवार फेरीचा दुसऱ्या दिवशी पानी फाउंडेशनच्या गटांनी विद्यापीठ फुलले. शिवार फेरीसाठी कृषी विद्यापीठात जमला शेतकरी मेळावा.दुसऱ्या दिवशी तब्बल 40  हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू भगिनींनी जाणून घेतले आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती.

'कोविड' महामारीच्या काळात सामाजिक निर्बंध असताना सोयाबीन शेतीशाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागात काम सुरू केले. शनिवारी (२१ सप्टेंबर) रोजी  शिवार फेरीच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनची नाळ विद्यापीठाशी  जोडली गेली आहे.

त्यामुळे भविष्यात येथील शेती व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी  हा ऋणानुबंध क्रांतिकारी ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ सिने अभिनेता  तथा पाणी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते व्यासपीठावर बोलत होते. सखोल ज्ञानार्जनाने कृषी क्षेत्रामध्ये प्रगती साधता येणे शक्य आहे. असे नमूद करून विद्यापीठातील प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरल्याचे सांगितले.

विद्यापीठाने शेतकऱ्यांकरिता निर्मित केलेल्या विविध तंत्रज्ञानाच्या प्रचार-प्रसार होण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन एक स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रयत्नात पाणी फाउंडेशन भरघोस योगदान देणार येणार आहे.

पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला

शनिवारी सकाळी नऊ वाजताच आमिर खान यांनी शिवाय फेरीसाठी नोंदणी करून प्रत्यक्ष प्रत्येक विभागाला भेट देत विद्यापीठाचे तंत्रज्ञान अगदी बारकाईने जाणून घेतले व शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून येणाऱ्या काळात शाश्वत ग्रामोद्धाराचा वसा आपल्या सोबत नेला.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले की, शाश्वत ग्रामविकासासाठी सर्वांच्याच एकात्मिक प्रयत्नांची गरज असल्याचे स्पष्ट केले. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत शुक्रवार (२० सप्टेंबर), शनिवार (२१ सप्टेंबर) रविवार (२२ सप्टेंबर) दरम्यान आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीत शनिवारी दुसऱ्या दिवशी अवघ्या विदर्भातून गडचिरोली पासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींनी प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

त्यावेळी शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करण्यात आले.  या प्रसंगी अकोला  विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, आ. अमित झनक, विठ्ठल सरप पाटील, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ अभियंता सतीश देशमुख, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला माल्यर्पण तथा दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या या विशेष वार्तालाप सोहळ्याचे  प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी केले.विद्यापीठातील विविध उपलब्धीसह शाश्वत शेती संपन्न शेतकरी संकल्पना वास्तवात आणण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्नांना अधोरेखित करताना कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठापद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली. आत्मनिर्भर विद्यापीठ निर्मितीसाठी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या.

विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी विद्यापीठाच्या शिवार फेरी आयोजन  एक स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. शेतकरी हिताच्या शासकीय योजनांची उपयुक्त माहिती दिली. पानी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करताना मिटकरी यांनी अशा उपक्रमांची गरज देखील अधोरेखित केली तर आमदार अमित झनक यांनी विद्यापीठाच्या प्रगत तंत्रज्ञानाची व शेतकरी हिताच्या दृष्टीने राबवित असलेल्या विस्तार कार्याची प्रशंसा केली.

अकोला कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन तथा विस्तार कार्यात अग्रेसर असून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले. तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या कार्यकाळात विद्यापीठाची शेतकरी आणि विद्यापीठाच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य तत्पर असल्याचे सांगितले.

यावेळी शिवार फेरी सभामंडपात शेतकरी बंधू-भगिनी, युवक-युवतीसह पाणी फाउंडेशनच्या संपूर्ण विदर्भातून आलेल्या विविध बचत गट सदस्यांची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन वं आभार प्रदर्शन विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

शेतकऱ्यांना पाहिले पीक प्रात्यक्षिक

* शनिवारी सकाळी ९ वाजेपासूनच विद्यापीठाचे शेतकरी सदन येथे शेतकरी बांधवांनी नोंदणीस सुरुवात करीत नोंदणी नंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे नियोजित २४ संशोधन विभागांना प्रत्यक्ष भेटी देत अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घेतले व उपस्थित शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले.

* यंदा देखील अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवाय फेरीचे नियोजन करण्यात आले असून गहू संशोधन विभागाचे २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत.

* त्यामध्ये एकूण २१० विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती आदींचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे तंत्रज्ञान शिफारशी चे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत. या प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवांची अभूतपूर्व गर्दी उसळलेली होती.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीअकोलाविद्यापीठ