Join us

पपई दोन रुपये किलो; दोन एकरांवर रोटावेटर !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 9:40 AM

वाहतूक खर्च निघेना, फुकटात वाटप

एकीकडे शासन शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करावेत, असे सांगत आहे. त्यानुसार शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी फळबागाकडे वळले आहेत. अणदूर येथील शेतकऱ्यानेही माळरानावर सुमारे दोन एकर क्षेत्रात पपई लागवड केली. तोडणी सुरू होण्यापूर्वी ३० रुपये दर होता. मात्र, दोन तोडे पूर्ण होताच दर थेट दोन रुपयांपर्यंत घसरला. यातून उत्पादन नव्हे, वाहतूक खर्चही निघत नसल्याने फुकटात वाटप केले. अखेर शेतकऱ्याने रविवारी सुमारे दोन एकरांतील पिकावर रोटर फिरविला.

पारंपरिक पिके घेतली तर उत्पादन खर्च आणि मिळणारा दर यात मोठी तफावत येते. ही पिके परवडत नाहीत. त्यामुळे शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. अणदूर येथील शेतकरी दीपक अशोक मोकाशे यांनी सुमारे दोन एकर क्षेत्रात पपई लागवड केली. यावर तब्बल अडीच लाख रुपये खर्च केला. तोडणी सुरू झाली तेव्हा बाजारात ३० रुपये दर होता. यातून चार पैसे हाती उरत असतानाच दर प्रचंड घसरले. २ रुपये किलो दराने विक्री करण्याची नामुष्की ओढावली आहे. मुंबई, पुणे येथे तर याही दराने व्यापारी खरेदी करीत नाहीत. मिळणाऱ्या या दरातून वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोकाशे यांनी गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना फुकटात वाटप केले. ही पीक आतबट्ट्याचे ठरल्याने अखेर रविवारी सुमारे दोन एकर क्षेत्रातील या पिकावर रोटर फिरविला.

निर्यातबंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्याचे सरकारने कंबरडे मोडले. आता फळबागाधारक शेतकरीही अडचणीत आले आहेत. ३० रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या पपईला अवघा दोन रुपये दर मिळत आहे. असे असतानाही सरकार आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला राजी नाही. सरकारच्या अशा धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. -दीपक मोकाशे, शेतकरी

 

टॅग्स :फळेबाजार