विजयकुमार गाडेकर
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील ताडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रामध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी वनविभागाने उपचारासाठी दाखल केलेल्या एका पॅरॅलिसिस झालेल्या काळविटाच्या मादीने शनिवारी दुपारी एका गोंडस पाडसाला जन्म दिला. आईची प्रकृती गंभीर असून, पाडस सुदृढ असल्याची माहिती 'सर्पराज्ञी'च्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली.
देशात वन्यजीवांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात एका पॅरॅलिसिस झालेल्या हरणीचे (काळवीट) पहिले बाळंतपण झाले, हे विशेष! तसंही पहिलं बाळंतपण हे माहेरीच, असा अलिखित नियमच आहे निसर्गाचा.
पॅरॅलिसिस झालेली ही काळविटाची मादी कामखेडा, ता. जि. बीड येथील शेतकरी काळकुटे यांच्या शेतात घायाळ अवस्थेत चार दिवसांपूर्वी आढळून आली होती. या घटनेची माहिती तेथील युवक सचिन मस्के यांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर वनविभागाच्या वनरक्षक पवार व राजेंद्र कोकणे यांनी घटनास्थळी जाऊन या काळविटाच्या मादीस ताब्यात घेतले होते.
त्यानंतर पुढील उपचारासाठी विभागीय वनअधिकारी अमोल गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली या काळविटाच्या मादीस तागडगाव येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले होते.
सर्पराज्ञीत उपचारासाठी दाखल केल्यानंतर ही काळविटाची मादी गर्भवती असल्याचे सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या लक्षात आले. त्यानंतर या हरिणीवर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले.
आतापर्यंत ३०० प्राण्यांचे बाळंतपण
■ २४ वर्षांपासून कार्यरत सर्पराज्ञी केंद्रात आतापर्यंत ३०० प्राण्यांचे बाळंतपण सुखरूप झाले आहे.
■ अर्धी पोटात, अर्धी बाहेर अडलेली काळवीट मादी, १५० ते २०० सर्प व अन्य वन्यजीवांचे बाळंतपण झाले आहे.
■ तरस आणि खोकडाचे सीझरही येथे करण्यात आलेले आहे.
हेही वाचा - Lactose Free Milk लॅक्टोज फ्री दुधाचे असे काही पर्याय जे शरीरसाठी आहेत वरदान