पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नसल्याने दिवाळीपासून घरात साठवून ठेवलेल्या कापसात पिसा झाल्याने लहानांपासून ते थोरांच्या अंगाला खाज येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळेल त्या (सरासरी ६५००) भावाने कापूस विक्री केला. परंतु, आता कापूस आठ हजार रुपये प्रतिक्विटंलने खरेदी केला जात आहे. त्यामुळे मायबाप सरकार, आता हे बरं नव्हे, असा उद्विग्न सवाल कमी भावात कापूस विकणाऱ्या संतप्त शेतकऱ्यांकडून सरकारला केला जात आहे.
दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरी गोड-धोड होते. मात्र, यंदा कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी तो घरात साठवून ठेवला. यंदा निवडणुका आहेत. त्यामुळे भाव वाढेल, या आशेवर कापसाचे ढीग वाढत गेले. मात्र तरीही शेतकर्यांच्या हाती फारसं काही उत्पन्न मिळालं नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन घटले
● गेल्या काही वर्षात कापसाचे उत्पादन घेणारे जमिनीचे क्षेत्र वाढले. मात्र, त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नाही. सध्या कपाशीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होत असली तरी ती शेतकऱ्यांना फारशी लाभदायक ठरत नाही.
● कारण, औषधी आणि इतर खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या हाती फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान, व्यापाऱ्यांचा फायदा
● महाशिवरात्रीपर्यंतही कापसाला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. घरातील कापसाला पिसा झाल्या होत्या. कापसाचा भाव ७००० रुपयांच्या पुढेही जात नव्हता. त्यात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे चांगल्या दर्जाचा कापूस६७०० भावाने व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
● यात काही व्यापाऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. त्यांनाच आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्ळ्याला पाणी येत असून, त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
भाववाढीची आशा नव्हती
दिवाळीनंतर कापसाला भाव मिळतो. परंतु, यंदा महाशिवरात्रीपर्यंत भाव मिळाला नाही. त्यानंतरही कापसाचे भाव वाढतील, असे वाटले नव्हते. परंतु, आता अचानकच कापूस आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. यात यापूर्वी कमी भावात कापूस विकून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. - सुखानंद पारवे, व्यापारी
आता कापूस दर वाढल्याचा फायदा नाही?
कापसाला भाव मिळेल, या आशेवर गेल्या चार महिन्यांपासून कापूस विकला नाही. परंतु, हे भाव वाढणार नसल्याचे व्यापारी सांगत होते. त्यामुळे ६७०० रूपये प्रतिक्विंटलने व्यापाऱ्यानी कापूस खरेदी केला. आता सरकारने शेतकऱ्यांचा कापूस संपल्यानंतर भाव वाढवले आहेत. ते आता शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाही. - शेनफड गंगावणे, शेतकरी
आता व्यापाऱ्यांची चांदी
सध्या शेतकऱ्यांचा कापूस आठ हजार रुपये भावाने खरेदी केला जात आहे. मागील आठवड्यात हाच कापूस ७ हजारांपेक्षा कमी भावाने घेण्यात आला. परंतु, आता शेतकऱ्यांजवळील कापूस पूर्णपणे विकण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कुणाचीही देणी नाहीत. त्यांनीच कापूस विकला नाही. आता त्यांचा फायदा आहे. परंतु, यात सर्वाधिक कापूस हा व्यापाऱ्यांजवळ असल्याने सर्वाधिक लाभ त्यांना मिळणार आहे. -सोमिनाथ अंभोरे, शेतकरी