Join us

परळी वैद्यनाथ कृषी महोत्सव : तांत्रिक मागदर्शनातून शेतकऱ्यांना मिळाला समृध्दीचा नवा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 12:11 PM

सध्या बीड येथील परळी वैजनाथ येथे कृषी महोत्सव सुरू आहे. त्याला राज्यातील शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. (Parli Vaidyanath Agricultural Festival)

संजय खाकरे

परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी(२३ ऑगस्ट रोजी) देखील राज्यभरातून शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी याठिकाणी भेट देऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत.

गडचिरोली, अमरावती, नागपूर, रत्नागिरी, रायगड ते अगदी कोल्हापूरपासून राज्यातील शेतकरी या प्रदर्शनास उदंड प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध कृषी उत्पादने व उमेद अभियानातील महिला बचत गटांच्या स्टॉल्स वर खरेदीसाठी पुरुषांसह महिलांची देखील मोठी गर्दी होताना दिसते.

तांत्रिक सत्रात रेशीम शेतीवर मार्गदर्शन

बदलत्या व असंतुलीत हवामानात शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीने रेशीम शेती हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे. तुती, रेशीम कीटकांचे जीवनचक्र, खाद्य, कीड व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण इत्यादी बाबी शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास रेशीम शेती नगदी उत्पन्न देते. नोकरदारांना दर महिन्याला पगार असतो.

त्याच पद्धतीने रेशीम शेतीतून दर महिन्याला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे, असे मत नागपूर रेशीम उपसंचालक श्री महेंद्र ढवळे यांनी कृषी महोत्सवात आयोजित तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.  यावेळी शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा काडीपासून माडी व माडी ते गाडी असा उन्नत प्रवास दाखवणारी चित्रफीतही दाखविण्यात आली. 

महाराष्ट्रात बीड जिल्हा हा रेशीम शेतीत प्रथम स्थानावर असून एकूण रेशीम उद्योगाच्या ४०% वाटा हा एकट्या बीड जिल्ह्याचा आहे.  यावेळी परळी तालुक्यातील दौनापूर गावचे प्रगतशील शेतकरी अरविंद आघाव, मलनाथपुरचे बाबा सलगर यांच्या रेशीम शेतीतील यशोगाथा उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या. बीडच्या लोळदगावाचे कृषी भूषण शिवराम घोडके व रामप्रसाद डोईफोडे यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याच्या पद्धती व फायदे यावर मार्गदर्शन केले. 

चर्चा सत्रास अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे सेंद्रिय शेती संशोधन विभागाचे अन्वेषक डॉ.आनंद गोरे, रेशीम शेती संशोधन केंद्राचे डॉ.चंद्रकांत लटपटे, कृषी विज्ञान केंद्र खामगावच्या डॉ.दीप्ती पाटगावकर, कृषी विद्यावेत्ता डॉ.वसंत सूर्यवंशी, डॉ. रमण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांसह आदी उपस्थित होते.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक