Join us

Parli Vaijnath Krishi Mahotsav : परळीत २१ ऑगस्ट पासून ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 11:36 AM

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

परळी वैद्यनाथ : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. 

या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध, विविध आधुनिक उपकरणे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती खरेदी करता यावे या दृष्टीने महोत्सव अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांना लाभदायक असणार आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्र सामुग्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, नवनवीन संशोधन, चर्चासत्रे तसेच विविध उत्पादने, पशूंच्या विविध प्रजाती यांसह अनेक अर्थांनी हा महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे.

मुंडेंकडून तयारीचा आढावा व पाहणीतत्पूर्वी आज सकाळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या समवेत कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. धनंजय मुंडेंनी परळीतील नियोजित जागेची पाहणी करून सभामंडप, स्टॉल्स, पार्किंग, सुरक्षा आदी व्यवस्था चोख करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, कृषी विभागाचे सह संचालक श्री. दिवेकर, श्री. मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांसह ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांसह कृषी, महसूल पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांनी या अधिकाऱ्यांसमवेत कृषी महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या परळी शहरातील बाजार समितीच्या मैदानावर सुरू असलेल्या संपूर्ण तयारीची पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेले शेकडो स्टॉल्स, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा आदी सर्व बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन चोखपणे करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.

टॅग्स :बीडशेतकरीशेतीसरकारराज्य सरकारधनंजय मुंडेशिवराज सिंह चौहानपरळी