हल्ली ठिकठिकाणी उगवणारे गाजर गवताचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत असून, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. ते नष्ट करणे अवघड असल्याने ३० टक्के शेतीच्या उत्पादनातही घट झाल्याचे समोर आले आहे. देशभरात या गाजर गवताने सुमारे ५० लाख हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण केल्याने शेतीक्षेत्राला धोका निर्माण झाला आहे.
१९७२ च्या दुष्काळात देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याने अमेरिकेने मिलो जातीचा लाल गहू भारतास मदत म्हणून पाठविला होता. त्या गव्हासोबत अमेरिकेतील गाजर गवताचे बीज सुद्धा देशात आले. पुढे हा उरलेला लाल गहू आपल्या कडील शेतकऱ्यांनी पेरला व गव्हासोबत गाजर गवताचे बीजही या धरतीत रुजले. हे बीज वजनाने हलके असल्याने वाऱ्याने उडून हळूहळू देशभर पसरले.
गाजर गवताचे शास्त्रीय नाव 'पार्थेनियम' (Parthenium) आहे. या ५० वर्षांत या गवताने ५० लाख हेक्टर भारतीय जमिनीवर आक्रमण केले आहे. हे तण हानिकारक असून, याचा काहीही उपयोग नाही. जनावरेही याला खात नाही, तसेच मानवी शरीरावर याचा विपरित परिणाम होत असल्याने अनेक शेतकऱ्यांसाठी हे गवत डोकेदुखी ठरल्याचे निरीक्षण फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायसेझनच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. (Parthenium hysterophorus)
एफएसआयआयच्या अहवालानुसार ९२ हजार करोड रुपये कृषी उत्पादन या गाजर गवतामुळे घटले आहे. या हानिकारक गवताचे पर्यावरण, मानवी आरोग्य व भारतीय अर्थ व्यवस्थेवर होत असणाऱ्या दुरगामी परिणामाबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील पर्यावरण संशोधक व संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी नुकतेच केंद्र शासनास पत्र लिहून या गवताच्या भारत भूमीतून समूळ उच्चाटनाची मागणी केली आहे.
देशातील कोट्यवधी लोकांना या गाजर गवताची अॅलर्जी होत आहे. गाजर गवत ही वर्षायू वनस्पती जरी असली, तरी एका रोपातून सुमारे १५ हजार बीज जमिनीवर पडते. ते एवढे हलके असते की, हवेने इतरत्र सहज उडून दुसरीकडे उडून रुजते. हवेमुळे त्याचे परागकण पसरल्याने अनेकांना याचा त्रास होतो.
यासोबतच ग्लोबल अस्थमा रिपोर्टनुसार गाजर गवतामुळे देशात २० कोटी लोकांना अस्थमा, डोळ्यांना खाज, वारंवार सर्दी होते. तसेच, त्वचेचा कॉन्टॅक्ट डर्माटायटीस हा कधीही न बरा होणारा त्वचारोग होत आहे.
वन्यजीवांनाही गाजर गवत घातक
८ टक्के जनतेस विविध स्वरूपात या गवताचा त्रास होतो. त्यासोबतच गवतावर चरणाऱ्या वन्यजीवांनी चुकून हे विषारी गवत खाल्ल्यास त्यांचे यकृत सुजने, अंगावरील केस जाणे, त्वचा सुजणे, डायरिया आदी त्रास होतो. गाजर गवत अधिक असलेल्या रहिवासी क्षेत्रात मलेरियाला कारणीभूत अॅनाफेलीस डासांची उत्पत्ती अधिक होते, ही नवीन बाब समोर आली आहे. - डॉ. संतोष पाटील, पर्यावरण संवर्धक, सिल्लोड.