नितीन चौधरी पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत गेल्या वर्षी साडेसात लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यंदा त्यात सात पटींनी वाढ असून, विमाधारकांची संख्या तब्बल ४९ लाख २४ हजारपर्यंत पोहोचली आहे. सध्या रब्बीपीक विमा योजनेअंतर्गत गहू, हरभरा, करडई यासाठी पीकविमा भरण्याची मुदत १५ डिसेंबर आहे. त्यामुळे विमाधारकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
३२ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षितप्रधानमंत्री पीकविमा योजनेत केवळ एक रुपयात विमा काढता येत असल्याने खरीप हंगामातील योजनेला राज्यातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्य सरकारने रब्बी हंगामातही एक रुपयातच विमा उपलब्ध करून दिल्याने आतापर्यंत ४९ लाख २४ हजार ८७ शेतकरी अर्जदारांनी विमा उतरवला आहे. त्यामुळे ३२ लाख ६० हजार ८३५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे तर १२,८१३ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सात लाख ४५ हजार ३१६ शेतकरी अर्जदारांनी पाच लाख ३४ हजार ९४७ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरला होता, तर विमा संरक्षित रक्कम दोन हजार ३२ कोटी रुपये इतकी होती. राज्य व केंद्र सरकारला त्यासाठी प्रत्येकी केवळ १२१ कोटी रुपयांचा हिस्सा प्रीमियमपोटी द्यावा लागला होता.
पीकविम्यापोटी यंदा राज्य सरकारला सुमारे ८४३ कोटी रुपयांचा प्रीमियम द्यावा लागणार आहे, तर केंद्र सरकारला ५९५ कोटी रुपयांची भर यात टाकावी लागणार आहे. विमा कंपन्यांना एकूण एक हजार ४३९ कोटी रुपयांचा हप्ता द्यावा लागणार आहे. अंतिम मुदत आणखी एक आठवडा शिल्लक असल्याने यात आणखी भर पडणार असून, सरकारचा प्रिमियमचा हिस्सा आणखी वाढू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
लातूरमध्ये सर्वाधिक शेतकरीलातूर विभागात सर्वाधिक १८ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला असून त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील १७ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पुणे विभाग तिसन्या क्रमांकावर असून येथे सुमारास सात लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे. कोकणातील केवळ २८ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.
विभागनिहाय सहभागी शेतकरी आणि विमा संरक्षित क्षेत्र (हे.)
विभाग | विभागनिहाय सहभागी शेतकरी | विमा संरक्षित क्षेत्र (हे.) |
कोकण | २८ | १४.९९ |
नाशिक | ८८,२९८ | ७४,४९१.९९ |
पुणे | ७,०९,४५८ | ४,७१,४६३.१६ |
कोल्हापूर | ५५,१७५ | ३१,४६९.१६ |
छत्रपती संभाजीनगर | १७,४६,३५२ | ८,८८,८३८.४५ |
लातूर | १८,२५,३०७ | १३,२४,५८२.६४ |
अमरावती | ४,५३,४५० | ४,३९,८००,८८ |
नागपूर | २६,०१० | ३०,१७४.५० |
राज्य | ४९,२४,०८७ | ३२,०७,८३५.६६ |