कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केळी पिकांवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्याच्या डिझाइनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले.
महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम मद्रेवार याने सहकारी मित्रांच्या सोबत महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले.
सोंडेकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी किडीच्या भुंग्याना आकर्षित करणाऱ्या कामगंध सापळ्यामध्ये खाद्यरूपी आमिष स्पंजाचा आणि महाविद्यालयात उत्पादित होत असलेल्या मेटाऱ्हायझीम या जैविक कीटकनाशकाचा वापर करीत हा सापळा तयार केला.
कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी मद्रेवार याच्या पुढाकाराने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या गटात संगीता धिन्वा, अपूर्वा श्रीष्टी, सिद्धाली शेगर, यश कांबळे, तुषार चव्हाण यांचा सहभाग आहे. पेटंट प्राप्त करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी विशेष समारंभात अभिनंदन केले.
कीटकनाशकांचे अवशेष फळामध्ये आढळून येत असल्याने रासायनिक औषधांचा मारा करणे हा निर्यातक्षम केळी उत्पादनाच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. यावर उपाय शोधण्यात यश आले. या संशोधनामुळे सोंडेकीडीच्या नियंत्रणास मदत होणार आहे.