राज्यातील साखर कारखाने इथेनॉलकडे साखर वळवत असल्यामुळे त्याच्या विक्रीतून कारखान्यांना मोठा फायदा होतोय. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही. परिणामी, शेतकऱ्यांची अडवणूकच होत आहे. यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा चारशे रुपये टनाला जास्त दर दिल्याशिवाय गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
साखर कारखाने दरवर्षी एक ते अडीच टक्के साखर उतारा इथेनॉलकडे वळवत आहेत. यातून कारखान्यांना किमान ७०० रुपयांचा फायदा होत आहे. मात्र, त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्याचप्रमाणे केंद्र सरकार इथेनॉल केवळ पन्नास रुपये लिटर या दरानेच खरेदी करत आहे. प्रत्यक्षात ग्राहकांना पेट्रोल १०५ रुपयांनी मिळते. शेतकऱ्यांना लाभ मात्र केवळ पन्नास रुपयेच आहे. त्यामुळे एफआरपी ठरविताना किमान चारशे रुपये जास्त दिल्याशिवाय यंदाचा साखर आणि सुरू होऊ देणार नाही. असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. कारखाने बंद करण्याचा इशारा चार महिन्यांपूर्वी सरकारला दिला असल्याचे ते म्हणाले.
यंदा साखर उत्पादनाला बसणार फटका
यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्यातील साखर कारखानदारीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. राज्यातील ४० टक्के ऊस उत्पादन विहिरी व कालव्यांवर अवलंबून आहे. परतीचा मान्सून न आल्यास याचा थेट परिणाम उत्पादनावर होईल. दुष्काळसदृश परिस्थिती असली तरी राज्य सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याचा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.