Join us

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे आठवड्यात द्या नाहीतर कारवाई; या २३ साखर कारखान्यांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:14 IST

Sugarcane FRP 2024-25 साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे पैसे दिले जात नसल्याने जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांना सोलापूर प्रादेशिक सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे.

अरुण बारसकरसोलापूर : साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे पैसे दिले जात नसल्याने जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांना सोलापूर प्रादेशिक सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे. आठ दिवसात ऊस उत्पादकांचे पैसे द्या, अन्यथा आरआरसीची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

साखर हंगाम सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला आहे. साखर कारखानदारांनी साखर कारखाने सुरू करण्याची घाई केली. उसाचे पैसे देण्यासाठी मात्र हात आखडता घेतला आहे. ही बाब रयत क्रांती शेतकरी संघटनेने मनावर घेतली.

ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील व रयत क्रांती संघटनेच्या दीपक भोसले व इतर पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालकांना पत्र देताच प्रादेशिक साखर कार्यालयाने ऊस उत्पादकांचे पैसे थकवणाऱ्या जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे.

आपण केंद्र सरकारच्या एफआरपी कायद्यानुसार १४ दिवसात ऊस उत्पादकांचे पैसे दिले नाहीत. आठ दिवसात ऊस उत्पादकांचे द्या, अन्यथा आपल्यावर आरआरसीची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. आरआरसीची कारवाई करण्याचे अधिकार साखर आयुक्तांना आहेत.

ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे दीपक भोसले व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचा विषय ऐरणीवर घेतल्याने किमान साखर कारखान्यांना नोटिसा दिल्या असल्या तरी साखर कारखान्यांनी मात्र शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत गंभीर घेतलेले दिसत नाही.

जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांची धुराडी पेटली असली तरी ऊस उत्पादकांचे पैसे देण्याची साखर कारखानदारांची मानसिकता दिसत नाही. साखर हंगाम सुरू होऊन ५० दिवसाचा कालावधीत लोटला तरी शेतकऱ्यांचे पैसे देण्याची तयारी कारखानदारांची दिसत नाही.

या कारखान्यांना बजावली नोटीससिद्धेश्वर सहकारी, संत दामाजी मंगळवेढा, संत कुर्मदास माढा, लोकनेते बाबुराव आण्णा पाटील अनगर, दि सासवड माळीनगर, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे, विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव, सिद्धनाथ तिर्हे, जकराया वटवटे, इंद्रेश्वर शुगर, भैरवनाथ लवंगी, युटोपियन मंगळवेढा, भैरवनाथ आलेगाव, बबनराव शिंदे तुर्कपिपरी, जयहिंद आचेगाव, आष्टी शुगर मोहोळ, सहकार शिरोमणी वसंतराव काळे वाडीकुरोली, धाराशिव शुगर (सांगोला सहकारी), अवताडे शुगर, येडेश्वरी बार्शी, विठ्ठल सहकारी गुरसाळे आदी २३ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे.

१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंतचे सोलापूर जिल्ह्यातील २३ व धाराशिव जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांकडे ४७२ कोटी ३९ लाख रुपये एफआरपीचे थकले आहेत. त्यानंतरच्या गाळपाच्या १५ दिवसाची एफआरपी देण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे द्यावेत. - प्रकाश आष्टेकर, सोलापूर प्रादेशिक सहसंचालक

अधिक वाचा: पन्नास वर्षे झाली तरी साखर कारखाने अजून कर्जातच! असं कसं शक्य आहे; काय हाय विषय? वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊससोलापूरशेतकरीशेतीसरकार