Join us

Pench Dam : पेंचच्या डाव्या कालव्यातील पाणी शिवारात; पिकांसह शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:40 PM

पेंच जलाशयाच्या रामटेक, मौदा मार्गे भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या डाव्या कालव्याला बुधवारी सकाळी भगदाड पडले. पिकांसह शेतीचे नुकसान झाले.

Pench Dam : 

पारशिवनी : पेंच जलाशयाच्या रामटेक, मौदा मार्गे भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या डाव्या कालव्याला बुधवारी (९ ऑक्टोबर) सकाळी भगदाड पडले. त्यामुळे उमरी (ता. पारशिवनी) शिवारातील किमान २३ शेतकऱ्यांच्या २५ हेक्टरमधील पिकांसह शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पेंच जलायश नवेगाव (खैरी), ता. पारशिवनी तालुक्यात असून, याच्या डाव्या कालव्याने नागपूर जिल्ह्यातील रामटेक व मौदा तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. या कालव्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पेंच पाटबंधारेच्या टेकाडी (कन्हान), ता. पारशिवनी येथील उपविभागीय अभियंता कार्यालयावर सोपवली आहे. 

हा कालवा फुटल्याचे लक्षात येताच सकाळी ९ वाजताच्या सुमारास कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. दुपारी २ वाजेपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने या शिवारातील नारायण शिलार, मनीषा गायकवाड, व्यंकट डोनारकर, गुलाब डोनारकर, साहेबराव वलुकार, सूर्यभान डोनारकर, दामू ठाकरे, सयाबाई खंगार, जानराव खंगार, श्रीपत राऊत, चिंतामन उरकुंडे, फागो बावणे, राष्ट्रपाल खोब्रागडे, ईश्वर राऊत (सर्व रा. उमरी व पाली) या शेतकऱ्यांच्या किमान २५ हेक्टर शेती आणि पिकांचे नुकसान झाले.

पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. के. अकुलवार, उपविभागीय अभियंता एम. एम. डांगे, तहसीलदार सुरेश वाकचौरे, तालुका कृषी अधिकारी राकेश वसू यांनी या कालव्याची तसेच नुकसानग्रस्त शेतासह पिकांची पाहणी केली. पेंच पाटबंधारे विभागाने या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

९ वाजता कालवा बंद

• उमरी शिवारातील लोहारा (रिठी) येथे या कालव्याच्या खाली जुना पूल आहे. येथून काही दिवसांपूर्वी पाणी झिरपायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी डागडुजीदेखील केली होती. बुधवारी सकाळी ६ वाजेपासून पुन्हा पाणी झिरपायला लागले.

• त्यानंतर काही वेळात तिथे १०० फूट लांब व १५ फूट खोल भगदाड पडले. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कालव्यात पाणी सोडणे बंद करण्यात आले असले तरी दुपारी २ वाजेपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरूच होता.

टॅग्स :शेती क्षेत्रधरणनागपूरशेतकरीशेती