Join us

Agriculture News : कापूस पिकात मिरचीचा जुगाड, दोन्ही पिकांतून सात लाख रुपयांचे अपेक्षित उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:47 IST

Agriculture News : महिंदळे येथील दीपक पाटील या शेतकऱ्याने आंतरपिकांचा यशस्वी (Intercropping Farming) प्रयोग केला आहे.

जळगाव : भडगाव तालुक्यातील (Bhadgoan Taluka) महिंदळे येथील दीपक पाटील या शेतकऱ्याने आंतरपिकांचा यशस्वी (Intercropping Farming) प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याने कपाशी पिकात मिरचीची लागवड करत चांगलं उत्पन्न मिळवलं आहे. दीपक पाटील यांना मिरचीचे अंदाजे अडीच ते तीन लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे.

मिरचीबरोबर (Chilly Farming) कपाशीची फरदडही जोमात आहे. त्यातूनही त्यांना पुन्हा २५ ते ३० क्विंटल कापूस अपेक्षित आहे. या जुगाडाने पाटील यांचे मात्र २ लाखावर थांबणारे उत्पन्न ६ ते ७ लाखापर्यंत जाणार आहे.

महिंदळे येथील दीपक रामदास पाटील यांनी एकाच खर्चात दुहेरी उत्पन्न काढले. त्यांनी आपल्या ३ एकर क्षेत्रात ठिबक सिंचनच्या सहाय्याने जून महिन्याच्या सुरुवातीला एक ड्रीप सोडून कापसाची लागवड केली. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने कपाशीमध्ये सुटलेल्या ड्रीपवर शेतात तयार केलेल्या घरगुती मिरची रोपाची लागवड केली. कापसाबरोबर मिरचीलाही रासायनिक खत व कीटकनाशक मिळते.

तीन एकरात ४० क्विंटल कापसाचे उत्पन्नजून महिन्याच्या सुरुवातीला दीपक पाटील यांनी कपाशीची लागवड केली. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने मिरची लागवड केली. कपाशी पिकासाठी केलेल्या खर्चात मिरचीही तयार होते. त्यांना तीन एकरात ४० क्विंटल कापसाचे उत्पन्न आले. त्यात त्यांना दोन लाखाचे उत्पन्न मिळाले.

त्यानंतर कापसाची छाटणी करून पुन्हा फरदळ पीक तयार होत आहे. कापसाची छाटणी झाल्यामुळे मिरची पीक तयार झाले. १५ दिवसाच्या अंतराने १० ते १२ क्विंटल मिरची निघत आहे. त्यातून त्यांना ४० ते ५० हजार रुपये मिळत आहेत. या दोन्हीही पिकांना अंदाजे ७० ते ८० हजार रुपये खर्च झाला आहे.

मी दरवर्षी पारंपरिक शेती करत होतो. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मात्र शून्यच असायचे; परंतु पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास उत्पन्नात भर पडण्यास मदत होते. मीही शेती आधुनिक पध्दतीने करण्याचे ठरवल्याने उत्पन्नात दुपटीने भर पडली आहे.- दीपक रामदास पाटील, शेतकरी, महिंदळे.

टॅग्स :शेती क्षेत्रआंतरपिकेशेतीकृषी योजनाकापूस