Join us

Pesticides Ban News : शेतकऱ्यांनो बंदी असलेल्या कीटकनाशकांचा वापर कराल तर? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:26 AM

राज्यात बंदी असलेल्या कीटकनाशकांची सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या जिल्ह्यात सरास वापर होताना दिसतोय त्याबद्दल न्यायालयाने काय आदेश दिले आहेत ते वाचा सविस्तर (Pesticides Ban News)

Pesticides Ban News : 

नागपूर : 

राज्यात बंदी असलेल्या कीटकनाशकांची सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये विक्री व उपयोग होऊ नये, यासाठी राज्य सरकार काय करीत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी( १८ सप्टेंबर) रोजी केली.

यावर दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून माळढोक पक्षी पूर्णपणे नामशेष झाले आहेत. आता प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा सारस पक्षीसुद्धा दुर्मीळ होताना दिसतोय. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 

उच्च न्यायालयाने सारस पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता स्वतः च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सस्टेनिंग एनव्हायरमेंट ॲण्ड वाइल्ड लाइफ असेंब्लीज (सेवा) संस्थेचे वकील ॲड. हिमांशू खेडीकर यांनी बंदी असलेल्या कीटकनाशकांची या तिन्ही जिल्ह्यांतील बाजारात सर्रास विक्री होत आहे.

ती कीटकनाशके शेतात वापरली जात आहेत, अशी माहिती दिली. तसेच या कीटकनाशकांमुळे सारस पक्ष्यांना धोका निर्माण होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता वरील आदेश दिला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी  किटकनाशकाचा वापर करतांना योग्य ती खबरदारी घ्यावी.  ॲड. राधिका बजाज यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.

येथे आढळतोय पक्षी 

विदर्भामध्ये केवळ गोंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातच हे पक्षी आढळून येतात. 

टॅग्स :शेती क्षेत्रकीड व रोग नियंत्रणशेतकरीशेती