दत्ता पाटीलतासगाव : कृषी क्षेत्रात बोगस सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. 'लोकमत'च्या मालिकेतून बोगसगिरी आणि फसवणुकीचा भांडाफोड करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने या सल्लागारांची माहिती गोळा करून कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सल्लागारांचे धाबे दणाणले आहेत.
कंपनी आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या सल्लागारांनी, शेतकऱ्यांपेक्षा स्वतःच्या हितावरच भर दिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. त्यासाठी शासनाने सल्लागारांबाबत कायदा आणि नियमावली तयार करावी. फसवणुकीला लगाम घालावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
द्राक्ष शेतीतील बदलते तंत्रज्ञान आणि हवामानामुळे शेतकऱ्यांना सल्लागारांची गरज भासू लागली. याच गरजेतून सल्लागारांचे पेव फुटले. सल्लागारांमुळे कंपनीची जोमाने विक्री होत असल्याचे लक्षात आल्यामुळे, कंपन्यांनी सल्लागारांना हाताशी धरले.
औषध कंपन्या आणि शेतकऱ्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत सल्लागारांनी कोटकल्याण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंपन्यांचा खप झाला. सल्लागारांचे आर्थिक हित साधले. मात्र शेतकरी अनावश्यक खर्चाला बळी पडून देशोधडीला लागला.
या कारनाम्यांचा 'लोकमत'मधून भांडाफोड केल्यानंतर, प्रशासनाने त्याची दखल घेत सल्लागारांची माहिती गोळा केली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय होऊन कायदा अस्तित्वात आल्यास सल्लागारांच्या कारभारावर नियंत्रण येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
शेती सल्लागारांसाठी कायद्याची अपेक्षा१) सल्लागारांना शासनाकडून नियमावली तयार करून परवाना देण्यात यावा.२) जिल्हास्तरावर कृषी विभागामार्फत सल्लागारांकडून अनामत रक्कम भरून नोंदणी करावी.३) शेतकऱ्यांना लिखित स्वरूपात सल्ला द्यावा४) सल्लागारांकडून जाणीवपूर्वक अतिरिक्त औषधांचा वापर करणारा सल्ला दिल्याचे निदर्शनास आढळून आल्यास संबंधितावर कारवाई व्हावी.५) द्राक्ष बागायतदार किंवा शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे किंवा त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांचा परवाना रद्द व्हावा.
सल्लागारांचे कारनामे▪️तासगावातील एका पीजीआर कंपनीचा मालक नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांना सल्ला देण्यासाठी जात होता, या मालकांना घेऊन जाणारा त्यांच्या गाडीतील ड्रायव्हर या व्यवसायातील पैसा पाहून ड्रायव्हरची नोकरी सोडून स्वतःच सल्लागार झाला.▪️सध्या हा ड्रायव्हर नाशिक जिल्ह्यात स्थायिक असून स्वतःच महागड्या चारचाकी गाडीतून शेतकऱ्यांना सल्ला देत आहे.▪️१०-१५ वर्षांपूर्वी दुचाकीवरून फिरणारे आणि एखाद्या औषध कंपनीत चार हजार रुपये पगारावर काम करणारे सल्लागार सध्या शेकडो कोटींचे मालक बनले आहेत.▪️काही सल्लागारांनी सल्ला देण्यापासून शेतकऱ्यांचा माल विक्री करून देण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कमिशन घेऊन शेतकऱ्याचे हित दाखवून देण्याचा उद्योग चालवला आहे.
सगळे सारखे नाहीतहवामानातील बदलामुळे द्राक्ष शेती संकटात असताना सल्लागारांनी स्वतःच्या बागेत प्रयोग करून शेतकऱ्यांना मौलिक मदत केली आहे. सगळेच सल्लागार एका माळेचे मणी नाहीत. काहींनी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांच्याकडून सल्ल्याची फी देखील घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरलेले देखील काही सल्लागार आहेत, हेदेखील वास्तव आहे.
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सल्लागारांचेही टोळकेशासकीय, निमशासकीय आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाची संघटना असते. मात्र, एकीकडे शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन तर दुसरीकडे पीजीआर कंपन्यांकडून कमिशन घेऊन दोन्ही ठिकाणी डल्ला मारणाऱ्या सल्लागारांनी स्वतःची संघटना स्थापन केल्याची माहिती उघड झाली आहे. कंपनीकडून मिळणाऱ्या मलईत ठराविक मोरक्यांनीच डल्ला मारल्यामुळे या संघटनेतही फूट पडल्याची चर्चा आहे.
'लोकमत' मध्ये वृत्त आल्यानंतर या सल्लागारांच्या म्होरक्यांनी घाबरून जाऊ नका, असल्या बातमीवर विश्वास ठेवू नका, असे म्हणून शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आपण सज्ज राहायला हवे, असाच अप्रत्यक्ष सल्ला दिल्याची चर्चा आहे. इतकेच शिक्षण न झालेल्या काही सल्लागारांनी बी.एस्सी. अॅग्री, एम.एस्सी. अॅग्री झालेले शेतकरीही माझा सल्ला घेऊन शेती करत असल्याचा आविर्भाव दाखवला आहे.
अधिक वाचा: PGR in Grape : 'पीजीआर'ची चौकशी; अधिकारी दोषी आढळल्यास होणार कारवाई