Join us

Phd Student & Professor's Protest : 'या' Phd धारकांच्या नोकऱ्या धोक्यात? पुण्यात विद्यार्थी अन् प्राध्यापकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 21:03 IST

पुण्यातील कृषी परिषद येथे या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून यासंदर्भात परिषदेने बैठक बोलवून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचं म्हटलं आहे.

Pune : कृषी पदवी अभ्यासक्रमातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय वगळण्यात आल्यामुले राज्यभरातील चारही कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र या विषयात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद येथे आंदोलन केले आहे. या आंदोलनासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातून पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे ६ व्या अधिष्ठाता समितीच्या अभ्यासक्रमामध्ये कायम राखण्यात यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. समितीने घेतलेला हा निर्णय कायम ठेवला तर आमच्या नोकऱ्यांवर गदा येईल असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय.

काय झालाय बदल?कृषि पदवी अभ्यासक्रमामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन ०४ विषय (८ भारांक) ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) (०+२ भारांक) व अनुभवातून शिक्षण (ELPModules) (०÷१० भारांकप्रत्येकी) शिकविल्या जात होते. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या ५ व्या अधिष्ठाता समिती अहवालानुसार कृषि पदवी अभ्यासक्रमामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या एका विषयाचा (३+१=४ भारांक) अंतर्भाव करण्यात आला होता.

नियमानुसार राज्याची निकड व महत्त्व लक्षात घेऊन ३० टक्केपर्यंत सदर अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्याची मुभा होती त्यानुसार पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे उपरोक्त अ. क्र.१. नुसार सर्व विषय कायम ठेवून शिकविण्यात येत होते. पण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून भा.कृ.अ.प. नवी दिल्ली यांच्या ६ व्या अधिष्ठाता समितीच्या अहवाल शिफारशीनुसार पुन्हा कृषि पदवी अभ्यासक्रमामध्ये फक्त एकाच विषयाचा (१+१=२ भारांक) अंतर्भाव करण्यात आला आहे. 

पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र हा विषय कृषिपूरकच नव्हे तर एकात्मिक कृषि व्यवसायसाखळीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी व ग्रामीण लोकसंखेचा शाश्वत विकास करण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाची जोड कृषि शिक्षणामध्ये आवश्यक आहे. पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये जनवारांचे आजार-चिकित्सा विषयक अभ्यासक्रमावर भर देण्यात येतो. तर कृषि पदवी अभ्यासक्रमांमध्ये खाद्यान्न व पशुव्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय संदर्भातील विषय शिकविण्यात येतात.

अभ्यासक्रमांमध्ये ३० टक्केपर्यंत सुधारणा करण्यास वाव असल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या चारही कृषि विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणे, मार्फत ६ व्या अधिष्ठाता समितीच्या कृषि पदवी अभ्यासक्रमामध्ये वरीलप्रमाणे सर्व विषयांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन कृषि पदवी धारकांना पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र ज्ञान प्राप्त होऊन सर्वसमावेशक विद्यार्थी घडून त्याचा उपयोग शेतकरी, पशुपालक व ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता केल्या जाईल तसेच मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मितीस चालना मिळेल अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीविद्यार्थी