Join us

Pik Panchnama : पीक पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची होतेय लूट कशी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:26 AM

सरकारने चांगल्या हेतूने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'एक रुपयात पीक विमा' योजनेत अनेक हिस्सेदार होत आहेत. सततच्या पावसाने पिके नासत असताना दिलेल्या इंटिमेशन (तक्रार) नुसार पंचनामा होईपर्यंत शेतकऱ्यांची घालमेल होत आहे, तर आलेला व्यक्ती पीक निहाय पैसे घेत आहे.

सोलापूर : सरकारने चांगल्या हेतूने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'एक रुपयात पीक विमा' योजनेत अनेक हिस्सेदार होत आहेत. सततच्या पावसाने पिके नासत असताना दिलेल्या इंटिमेशन (तक्रार) नुसार पंचनामा होईपर्यंत शेतकऱ्यांची घालमेल होत आहे, तर आलेला व्यक्ती पीक निहाय पैसे घेत आहे.

पीक नुकसान पंचनाम्यासाठी कळमण भागात एका अर्जाला (पिकाला) दोनशे, कोंडी पट्टयात पाचशे, तर नान्नज भागात सातशे रुपये घेतले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात यंदाही न थांबणाऱ्या पावसाने खरीप पिकांची दाणादाण उडवली आहे.

यंदा जून महिन्यात खरीप पेरणीसाठी पोषक पाऊस पडल्याने जिल्ह्यात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत होणारी तुरीची पेरणी यंदा चांगला पाऊस पडल्याने लवकर म्हणजे जुलै महिन्यात उरकली.

त्यानंतर सर्वच खरीप पिकांसह कारले, दोडके, टोमॅटो, वांगी व भाज्यांचे क्षेत्रही वाढले होते. मात्र, सप्टेंबर अखेरला व त्यानंतर पडलेल्या पावसामुळे ऊस, केळी वगळता इतर सर्वच पिके पाण्यात गेली आहेत.

पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने उभी पिके नासत आहेत. सततच्या पावसाने शेतकरी विमा कंपनीला इंटिमेशन देत आहेत. इंटिमेशन दिल्यानंतर आपली तक्रार पात्र झाली की, अपात्र झाली, हे समजेपर्यंत शेतकऱ्यांची घालमेल होत आहे.

इंटिमेशन पात्र ठरली, तर पंचनाम्याला शेतापर्यंत माणूस येईपर्यंत संपर्क करावा लागतो. पंचनाम्यासाठी आलेला व्यक्ती किती अर्ज (किती पिके) आहेत, हे पाहून पैशांची मागणी करतो. पैशांशिवाय पंचनामा केला जात नाही. पैसे नाही दिले, तर नुकसान कमी दाखविले जाते.

पंचनामा न करता परत पाठविलेअकोलेकाटी येथे पीक नुकसान पंचनाम्यासाठी काही तरुण आले. ते एका पिकाला दोनशे, तीनशे व त्यापेक्षा अधिक रक्कम मागू लागले. गावातील पदाधिकाऱ्यांनी पंचनामे थांबवून त्यांना परत पाठविले व तत्कालीन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांच्याकडे तक्रार केली. आठ दिवस कोणीच पंचनाम्याला आले नसल्याने शेतकरी घाबरले. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या युवकांनी कमी पैसे घेऊन पंचनामे केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पीक नुकसान पंचनाम्यासाठी विमा कंपनीने खासगी कंपनीला काम दिलेले असते. या पंचनाम्यासाठी विमा कंपनी पैसे देते. शेतकऱ्यांकडून पैसे घेणे अपेक्षित नाही. अशा तक्रारी आल्या, तर त्याचे काम थांबवितो व दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केली जाते. - जगदीश कोळी, विमा कंपनी, जिल्हा प्रतिनिधी

अधिक वाचा: अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालंय पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी कसा कराल दावा.. वाचा सविस्तर

टॅग्स :पीक विमाशेतीशेतकरीपीकपाऊसखरीपसरकार