Join us

Pik Vima : पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीस ७२ तासांच्या आत कळवावे तरच होईल कार्यवाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:27 PM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन व खरीप कांदा पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे.

बारामती : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन व खरीप कांदा पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या खरीप हंगाम पिकांचा विमा काढलेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, पूर, भूस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग अशा घटनांमुळे विमा संरक्षित पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानग्रस्त पिकाच्या छायाचित्रासह विमा कंपनीस सूचित करावे.

त्यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक १८००२६६०७००, ई-मेल pmfby.maharashtra@hdfcer go.com, विमा कंपनीचे तालुका कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला त्या बँकेची शाखा, कृषी रक्षक संकेतस्थळ हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १४४४७ पर्यायांचा वापर करून विमा कंपनीला सूचित करावे.

एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कं.लि. या विमा कंपनीमार्फत विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नुकसानीबाबतची सूचना प्राप्त झाल्यानंतर वैयक्तिकस्तरावर नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची तरतूद पीक विमा योजनेत आहे.

अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे कार्यालय व संबंधित गावचे कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन बांदल यांनी केले आहे.

टॅग्स :पीक विमापीकशेतकरीशेतीपाऊसगारपीटखरीप