बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे. नैसर्गिक आपत्ती आणि इतर जोखमींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून संरक्षण करते. (Crop Insurance)
या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरून निघण्यास मदत होते आणि त्यांच्या उत्पन्नाला संरक्षण मिळते. परंतु गंगापूर तालुक्यात विमा कंपन्यांनी पीक विम्याची नुकसानभरपाई देताना शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे प्रकार समोर आला आहे. (Pik Vima)
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक रुपयांत पीक विमा योजना आणली आहे. पण विमा कंपन्यांनी पीक विम्याची नुकसानभरपाई देताना शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केली आहे. (Crop Insurance)
मागील वर्षीच्या रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईपोटी विमा कंपनींकडून शेतकऱ्याच्या खात्यावर १९ रुपये १६ पैसे आणि २७ रुपये ९१ पैसे जमा करीत थट्टाच केल्याचे दिसून आले. (Crop Insurance)
शासनाने वर्ष २०२२ पासून १ रुपयांत पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार विमा कंपनीला देते. यामुळे पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अडीच पट वाढली आहे. (Pik Vima)
२०२३-२४ साठी गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील शेतकरी सचिन मगन सवई आणि त्यांचे बंधू सागर मगन सवई यांनी त्यांच्या गट नंबर ६ मध्ये प्रत्येकी ४३ गुंठे क्षेत्रावर आणि गट नंबर ७ मध्ये प्रत्येकी २७ गुंठे क्षेत्रात गव्हाची पेरणी केली होती. दोन्ही भावंडांनी पीक विमा उतरविला होता. (Pik Vima)
डिसेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसाने गव्हाचे नुकसान झाले. या नुकसानीची सूचना त्यांनी विमा कंपनीला दिली. प्रतिनिधींनी पंचनामे केले. दीड वर्षानंतर विमा कंपनीने भरपाई दिली. (Pik Vima)
सचिन आणि सागर सवई यांच्या बँक खात्यात गट नंबर ६ मधील नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी २७ रुपये ९१ पैसे जमा केले. तर, गट नंबर ७ मधील २७ गुंठ्यांतील पीक नुकसानभरपाईसाठी १९ रुपये १६ पैसे अदा केले आहेत.
तर, त्यांच्या वडिलांना १० गुंठ्यातील गव्हाच्या पिकाची ७०० रुपये नुकसानभरपाई दिली. सचिन यांच्या नांदेडा येथील ८० गुंठे पिकाच्या नुकसानीपोटी ५, ७०३ रुपये दिले. ४३ गुंठे क्षेत्रातील नुकसानाची भरपाई २७ रु. ९१ पैसे, तर २७ गुंठे जमिनीतील नुकसानीच्या भरपाईपोटी १९ रु. १६ पैसे, अशा हास्यास्पद रकमा अदा करण्यात आल्या आहेत.
सावळा गोंधळ
वर्ष २०२३-२४ मधील पीक विमा नुकसानभरपाई देताना विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. रांजणगाव शेणपुंजी येथील सवई बंधूंना गहू पिकाच्या नुकसानभरपाईपोटी १९ रुपये १६ पैसे, २७ रुपये ९१ पैसे दिल्याचे दिसून येते. याविषयी गंगापूर तालुका शेतकरी मित्र संघटना, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार आहे. - राजेंद्र शेळके, संघटना पदाधिकारी
३-४ अर्ज असतील तर...
संबंधित लाभार्थी शेतकऱ्याने ३ ते ४ पिकांचा विमा अर्ज भरलेला असेल तर सर्व विमा अर्जाची एकत्रित नुकसानभरपाई एक हजार रुपयाला राऊंड केली जाते. त्यामुळे अशा कमी रकमेचे विमा अर्ज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या लाभार्थी शेतकऱ्याची एकत्रित नुकसानभरपाई एक हजार रुपयांपर्यंत असावी, याची दक्षता विमा कंपनी घेते. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येईल. - प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक