सोलापूर : पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम न दिल्यास पुढील कार्यवाहीस तयार राहा, अशी तंबी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिली आहे.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२३ अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटिमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख १३ हजार ५६३ इतकी असून यापैकी २५ हजार ७१ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा झालेली आहे.
उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम शासनाच्या आदेशानुसार जेवढ्या शेतकऱ्यांचे शक्य आहेत, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. विमा रक्कम रोखणे कायद्याने गुन्हा आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी राहुल गायकवाड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तसेच पूर्वीचे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ आदी उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ नुकसानभरपाईची सद्य:स्थिती बैठकीत मांडली. यामध्ये हंगाम मध्य प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई वाटप हे जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार ७५० शेतकऱ्यांना ११५ कोटी झालेले असून १३ हजार ५३३ शेतकऱ्यांना ९३ लाख रुपये मिळणे बाकी असल्याचे सांगितले.
१४ हजार पंचनामे पूर्णस्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक पंचनामे आधारित नुकसानभरपाई २५ हजार ९५४ शेतकऱ्यांची झालेली होती. यानुसार २४ हजार ७७२ शेतकऱ्यांना २४ कोटी ३३ लाखांचे वाटप झाले. त्याप्रमाणेच काढणीपश्चात नुकसानीअंतर्गत २१ हजार ३८४ पूर्वसूचनापैकी १४ हजार, ४५४ पंचनामे पूर्ण झाली असून त्यापैकी ३३१३ शेतकऱ्यांना अखेर एक कोटी ९६ लाखांचा निधी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.