खरीप २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा (PM Crop insurance) योजनेंतर्गत धान शेतीचा विमा काढलेला होता. अवकाळी पावसात शेतीचे प्रचंड नुकसान होऊनही फक्त १,८०० रुपयांच्या नुकसानभरपाईचा धनादेश आला. ही तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यलयात नेऊन परत केली. पालडोंगरी (ता. मोहाडी, जि. भंडारा) येथील शेतकरी सुखदास गोमा डहाके, असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे विमा कंपनीकडून सर्वे करण्यात आला होता, परंतु विमा कंपनीकडून १,८०० रुपयांचा धनादेश आला. कृषी दिनी या शेतकऱ्याने उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्याकडे तो सुपुर्द केला.
शेतपिकाला सुरक्षा कवच म्हणून पिकांचा विमा (Pik Vima) काढला जातो. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनींकडून आर्थिक मदत दिली जाते. मागील वर्षात शासनाकडून पीक विमा योजनेत बदल करण्यात आले व शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम १ रुपया करण्यात आली. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचा विमा काढला.
बऱ्याच शेतकऱ्यांची उपजिवीका ही शेतीवर अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी गरीब आहेत. बरेच शेतकरी दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने खरीप २०२३ मध्ये पीक विमा काढला होता. नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ ला तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले होते. शेतकऱ्यांची अशी बिकट परिस्थिती असताना व या सर्व परिस्थितीची नोंद महसूल विभाग आणि कृषी विभागाकडे असताना सुद्धा शेतकऱ्यांना मिळत असलेली पीक विम्याची रक्कम खूपच कमी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम एक हजार ते दीड हजार, अशी अत्यल्प मिळाली आहे. विमा कंपनीकडूनही शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे ७० रुपयेपीक विम्याच्या नावाखाली खासगी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून कुणाला ७० तर कुणाला २०७ रुपये अशी अल्पशी भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.
शासनाने पीक विमा कंपनीना पीक विम्याचे हप्ते दिले व नैसर्गिक आपत्तीत शेत पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांचे आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला टोल फ्री नंबर किंवा ई-मेलवर माहिती देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपनीला ही माहिती विहित कालावधीत देऊन सुद्धा कंपनीने विमा एजंटमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे शेतात सर्वेक्षणासाठी आले नाही. याबाबत स्थानिक विमा प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी व कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे मोबाइल न घेता थेट कंपनीच्या ट्रोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा सल्ला देत असल्याचे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयातील विमा प्रतिनिधी व जिल्हा प्रतिनिधी यांनी फोन उचलला नाही.
...तरीही विमा प्रतिनिधी सर्वेक्षणासाठी आले नाही! नोव्हेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे तोंडाशी आलेले भरघोस तुरीचे पीक मातीमोल झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या ट्रोल फ्री क्रमांकावर माहिती दिली. याबाबत विमा कंपनीने लवकरच शेतकऱ्यांच्या शेतात सर्वेक्षणासाठी विमा प्रतिनिधी येऊन सर्वेक्षण करतील व नुकसान भरपाईबाबत अहवाल आल्यावर विमा कंपनी मदत देईल, असा संदेश आल्यावर अनेक शेतकरी विमा कंपनीचे प्रतिनिधीची वाट पाहत पीक काढले. परंतु विमा कंपनीचे प्रतिनिधी आले नाही.
कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा जूनमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधीने कंपनीच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे सर्वेक्षण न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, असे सांगितले व कंपनीच्या वरिष्ठांसोबत बोलावे म्हणून नुकसान भरपाई होऊनही शेतकरी तालुका कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहे. ३० जूननंतर विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केली. ती सुद्धा अल्पशी असल्याने शासन व विमा कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
दरवर्षी पीकविमा काढतो. यावर्षी सुरुवातीला अतिवृष्टी व सोयाबीन परिपक्व होण्याच्या वेळेस अतिवृष्टीने सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. असे असताना शासनाने दुष्काळ जाहीर करूनही पीक विम्याचे केवळ २०७ रुपये प्रधानमंत्री पीक विम्याचे खात्यात जमा झाले. ही शासनाकडून शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे. - रामेश्वर तायडे, कारंजा रमजानपूर
यावर्षी सुरुवातीला अतिवृष्टीनंतर अल्प पावसाने सोयाबीन पिकांचे उत्पादनात मोठी घट झाली. तुरीचे पीक मातीमोल झाले. विमा कंपनीच्या प्रतिनिधीने ३० जूननंतर नुकसान भरपाई खात्यात येईल म्हणून आशेवर असताना ३ जुलैला खात्यात ७० रुपये ९१ पैसे जमा झाल्याचा संदेश आला. - सचिन कोगदे, नया अंदुरा