पुणे : पंतप्रधान खरीपपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यात १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, या योजनेची अंतिम तारीख १५ जुलै आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी या योजनेत १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता; त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये सुमारे ६० लाख शेतकऱ्यांचा सहभाग करून घेण्याचे आवाहन कृषी विभागापुढे उभे ठाकले आहे.
पंतप्रधान खरीपपीक विमा योजना राज्यात एक रुपयात उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या खरीप हंगामात घेतला होता. त्यामुळे राज्यातील १ कोटी ७० लाख ६७ हजार ४४४ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. त्यामुळे यंदाही योजना सुरूच ठेवण्यात आली आहे.
राज्यात १२ जुलैपर्यंत १ कोटी १० लाख ७१ हजार ६४० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. हे प्रमाण ६४.८७ टक्के आहे. राज्यात २९ लाख ९१ हजार ३२८ शेतकरी लातूर विभागातील असून संभाजीनगरमधील २९ लाख २० हजार ५०८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.
७२ लाख २९६२ हेक्टर क्षेत्र केले विमासंरक्षित
■ विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले ७२ लाख २ हजार ९६२ हेक्टर क्षेत्र विमासंरक्षित केले आहे. यातून ३५ हजार ४१३ कोटी रुपयांची रक्कम विमासंरक्षित करण्यात आली आहे.
■ यात राज्याचा अनुदान हिस्सा ३ हजार १९७ कोटी रुपये असून केंद्र सरकारचा अनुदानाचा हिस्सा २ हजार २२७ कोटी रुपये आहे. एकूण अनुदानाची रक्कम ५ हजार ४२५ कोटी रुपये इतकी आहे.
विभागनिहाय शेतकरी
कोकण ८४,७९७
नाशिक ७,३४,१८५
पुणे १३,६६,२५८
कोल्हापूर ३२,३४,४६२
संभाजीनगर २९,२०,५०८
लातूर २९,९१,३२८
अमरावती १९,२६,४७७
नागपूर ७,२४,६२५
एकूण १,१०,७१,६४०
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे