सोलापूर: पिकांची रास करताना उत्पन्न हाती आलेच नाही कारण पाऊस नसल्याने पिके होरपळून निघाली होती. पीक कापणीला नऊ- दहा महिन्यांचा कालावधी लोटला मात्र विकास विमा कंपनीने मंजूर केलेली जिल्ह्यातील एक लाख ८० हजार शेतकऱ्यांची ७० कोटी ७४ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई अद्याप दिली नाही.
यंदाचा खरीप हंगाम मध्यावर आला तरी मागील वर्षीची नुकसान भरपाई विमा कंपनी देऊ शकली नाही. मागील वर्षी जिल्ह्यात अल्पसा पाऊस पडला होता. पर्यायाने खरीप रब्बी व बहुवार्षिक पिकांनाही फटका बसला होता. खरीप हंगामातील पिके तर जागेवरच होरपळून गेली होती.
उन्हाळ्यात तर पिण्यासाठीही पाणी मिळेनासे झाले होते. जून महिन्यात लवकर पाऊस पडल्याने पाण्याचे संकट दूर झाले. मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मनावर घेऊन शिवाय राज्य शासनाने एक रुपयात विमा भरण्याची सोय करून दिल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता.
पीक कापणी प्रयोगानुसार उत्पादन कमी आल्याने विमा नुकसान भरपाईला शेतकरी पात्र ठरले. असे पात्र जिल्ह्यात एक लाख ८० हजार शेतकरी असून त्यांना ७० कोटी ७४ लाख रुपये द्यायचे आहेत.
मात्र ही रक्कम अद्याप दिली नाही. खरीप हंगामातील पीक कापणीचा कालावधी हा ऑक्टोबर-नोव्हेंबर असतो. पीक कापणी प्रयोगानुसार पात्र ठरलेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
उत्तर, मोहोळ, पंढरपूरसाठी भरपाई मंजूर नाही
माढा तालुक्यातील ३१ हजार शेतकऱ्यांची २४ कोटी ३६ लाख, करमाळ्यातील ३५, ३५४ शेतकऱ्यांचे १३ कोटी, अक्कलकोट तालुक्यातील ३२,२१३ शेतकऱ्यांचे १३ कोटी ३९ लाख, सांगोल्यातील ३३,४८६ शेतकऱ्यांचे ९ कोटी ७ लाख, मंगळवेढ्याच्या ३३,४९१ शेतकऱ्यांचे ७ कोटी ३२ लाख, माळशिरस ११,९४२ शेतकऱ्यांचे २ कोटी ७७ लाख, दक्षिण सोलापूरच्या २२०३ शेतकऱ्यांचे ५६ लाख, बार्शी तालुक्यातील २११ शेतकऱ्यांचे ९७ हजार रुपये मंजूर असलेली रक्कम विमा कंपनीकडे अडकली आहे. उत्तर सोलापूर, मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली नाही. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे २३ हजार शेतकऱ्यांना २३ कोटी व प्रतिकूल परिस्थितीची नुकसान भरपाई एक लाख ९० हजार शेतकऱ्यांना ११३ कोटी ८२ लाख रुपये मिळाली आहे.