नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पालघर जिल्ह्यात भात, नाचणी व उडीद ही पिके योजनेंतर्गत अधिसूचित आहेत. भात, नाचणी, उडीद पिकासाठी निर्धारित केलेल्या पीक विमा हप्त्याच्या शेतकरी हिश्श्याची रक्कम अनुक्रमे रुपये १०३५.३०/-, ४००/- व ५०० पैकी फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यास या योजनेत सहभागी होता येणार आहे.
उर्वरित शेतकरी हिश्श्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याने आपला सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज घेऊन हप्ता भरून सहभाग घ्यावा.
हप्ता भरलेली पोचपावती जपून ठेवावी. सी.एस.सी. केंद्र आपले सरकार पोर्टलच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभागी होऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे साहाय्य घेऊ शकता.
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्त संख्येने सहभागी व्हावे, याकरिता जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या