अरुण बारसकरसोलापूर : केवळ चोवीस तासांत राज्यात दोन लाख ६७ हजार पीकविम्याची नोंद झाली असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पिकांचा एक रुपयात विमा भरण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात येत आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असून १५ जुलैपर्यंत विमा भरण्याची अंतिम तारीख आहे. यंदा राज्यात सर्वत्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्याने खरीप पेरण्याही लवकर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांनीही विमा भरण्यासाठी पोर्टल १६ जून रोजी ओपन केले आहे.
दरवर्षी एक जुलैपासून खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यास सुरुवात होते. यावर्षी विमा कंपन्यांनी १५ दिवस अगोदरच पोर्टल सुरू केले. सुरुवातीचे चार-पाच दिवस शेतकऱ्यांना माहिती नसल्याने शिवाय पेरण्याही झाल्या नसल्याने शेतकरी पीकविमा भरण्यासाठी पुढे आहे नाहीत.
मात्र, या चार-पाच दिवसांत शेतकरी विमा भरण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रांवर गर्दी करीत आहेत. २५ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात १५ लाख १५ हजार अर्ज पीकविम्यासाठी आले आहेत. २४ जून रोजी सकाळी १२ लाख ४७ हजार २२८ अर्ज ऑनलाइन आले होते.
तर २५ जून रोजी सकाळी ११ वाजता १५ लाख १४ हजार ५३१ अर्ज विम्यासाठी पोर्टलवर आले आहेत. म्हणजे केवळ २४ तासांत दोन लाख ६७ हजार ३०३ अर्ज आले आहेत. पाऊस चांगला पडल्याने राज्यात सर्वत्र खरीप पेरणीची लगबग सुरू आहे शिवाय पीकविमा भरण्यासाठीही तेवढीच गर्दी होत आहे.
मराठवाडा आघाडीवरपीकविमा भरण्यासाठी राज्यातच ओघ आहे. मात्र मराठवाडा सर्वात पुढे आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात दोन लाख ३१ हजार, धाराशिव जिल्ह्यात एक लाख ३९ हजार, छत्रपती संभाजीनगर एक लाख ८७ हजार, जालना एक लाख २४ हजार, अहमदनगर जिल्ह्यात एक लाख १२ हजार, परभणी ९१ हजार, सोलापूर व बुलढाणा प्रत्येकी ६५ हजार, नांदेड ६० हजार, याशिवाय मराठवाडा व विदर्भातील इतर जिल्ह्यांतही विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
खरीप पीक विमा भरण्यासाठी १५ जूनपासून पोर्टल सुरू झाले आहे. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गावातील महा ई सेवा केंद्रावर पीक विमा भरुन घ्यावा. एका पीकाच्या अर्जासाठी एक रुपया भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरुन घ्यावा. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) पुणे
अधिक वाचा: तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल?