बीड शहरातील भाजी मंडईत बारा महिने गुलाबी दिसणाऱ्या लसणाची मागणी असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने भाव वाढत चालले आहेत. हायब्रीड लसणापेक्षा गावरान लसूण मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी दिसणारा लसूण लावला तर अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत एका एकरमधून जवळपास तीन क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातील भाजी मंडईमध्ये गुलाबी रंगाचा लसूण पहावयास मिळत नाही. मोठा व चांगल्या प्रतिचा लसूण मिळाला तरी त्याचा भाव ३५० रुपये असतो. हा लसूण काही मोजक्या शेतकऱ्यांकडेच उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
काही नागरिक या लसणाला गावरान असे सुद्धा म्हणतात. दरम्यान, आठवडी बाजारपेठेत भाजीपाला नेहमीच मिळतो. पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळ भाज्यांचे भाव कमी जास्त होत असतात; परंतु हायब्रीड ऐवजी गुलाबी रंगाच्या लसणाला नेहमीच मागणी असते.
चांगल्या प्रतीचा लसूण उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पांढरा शुभ्र लसूण खरेदी करावा लागतो. ज्याची मागणी बाजारात कायम असते असे वाण शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक असते, असे मत शेतीमधील जाणकारांतून होत आहे. व्यक्त होत आहे.
... असे लागते हवामान
समशितोष्ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्त असते. मात्र अति उष्ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. पिकाच्या वाढीच्या काळात ७५ सेमीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्यास पिकाची वाढ चांगली होत नाही. ऑक्टोबर महिन्यात केलेली लागवड अधिक उत्पादन देते.
दिवसाचे २५ ते २८ अंश सेल्सिअस व रात्रीचे १० ते १५ अंश सेल्सिअस तापमानात गढ़ढ्यांची चांगली वाढ होते. मध्यम खोलीच्या भरपूर सेंद्रीय खते घातलेल्या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्या प्रकारे घेता येते. हलक्या प्रकारच्या जमिनी, चिकण मातीच्या जमिनी लागवडीस योग्य नसतात.
...असे आहेत गुणधर्म
लसूण हे कंदवर्गीय मसाल्याचे पीक आहे. अन्न पदार्थ स्वादिष्ट होण्यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग केला जातो. लसणात प्रोपील डायसल्फाईड व लिपीड ही द्रव्ये असतात. चटण्या, भाजी व लोणचे यात लसणाचा वापर केला जातो. पोटाच्या विकारावर पचनशक्ती, कानदुखी, डोळ्ळ्यातील विकार, डांग्या खोकला इत्यादीवर उपचारासाठी गुणधर्मही लसणात आहेत. बीड जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात गुलाबी दिसणाऱ्या गावरान लसणाची लागवड केली जाते.
...अशा आहेत सुधारित जाती
• महाराष्ट्रामध्ये फुले नीलिमा, फुले बसवंत, गोदावरी, भीमा पर्पल या जाती असून या सर्वांचा रंग गुलाबी किंवा जांभळा असतो. गोदावरी वाणाचा स्वाद अगदी तिखट असून राहुरी विद्यापीठाने हे वाण विकसित केले आहे.
• लागवडीसाठी सुधारित जातीचे बेणे वापरावे. रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात लागवड करावी. उशिरा लागवड केल्यास लसणाच्या कंदाचा आकार कमी होतो, वजन कमी भरते, परिणामी उत्पादनात घट होते.
आंतरपीकसुद्धा येते घेता
लसूण पिकामध्ये वाफ्यांच्या वरंब्यावर कोबी, कोथिबीर किंवा मुळा इत्यादी कमी कालावधीच्या पिकांची लागवड करता येते. तसेच लसणाची आंतरपीक म्हणून ऊस, मिरची, फळबागांमध्येसुद्धा लागवड करता येते.
व्यावसायिक पद्धतीने लसूण शेती करावी
आपल्या भागातील शेतकरी खाण्यापुरताच लसून लावतात. परंतु व्यावसायिक उद्देश समोर ठेवून लसून केला पाहिजे. जिल्ह्यात उत्पादन कमी असल्याने बाहेर राज्यातून बीडमध्ये लसून येतो. सद्यःस्थितीला लसनाला चांगला भाव मिळत आहे. लसून शेती व्यावसायिक पद्धतीने केली तर परवडण्यासारखी आहे. - प्रकाश कुलकर्णी, प्रगतिशील शेतकरी, वैद्यकिन्ही, ता. पाटोदा जि. बीड.