नागपूर : 'पिवळी ज्वारी'चा (yellow jowar) वापर पिकांमध्ये वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढू शकते, कारण हे पीक दुष्काळ आणि उष्णतेला प्रतिरोधक आहे. या ज्वारीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ते जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि मानवाच्या आहारासाठी उपयुक्त आहे.(yellow jowar)
भारतात ज्वारीखालील क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. कमीत कमी निविष्ठांसह विविध हंगाम व भौगोलिक परिस्थितीत घेता येणारे पीक म्हणून ज्वारी प्रसिद्ध आहे.
या पिकाची अधिक उत्पादन क्षमता वाढवावी, या हेतूने अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करीत आहेत. यातच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) चे संशोधक डॉ. गजानन हनुमंतराव नाईक यांनी पिवळी ज्वारी अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असणारे प्रोजेनीस शोधले आहे.(yellow jowar)
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत डॉ. नाईक यांचा पीएच.डी.चा विषय 'स्टडी ऑन इंड्यूज्ड म्युटेशन इन येलो पेरिकार्प सोरघम (सोरघम बाइकलर एल. मोंच)' असा होता.(yellow jowar)
डॉ. नाईक यांनी कृषी वनस्पती विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक डॉ. एच. व्ही. काळपांडे यांच्या मार्गदर्शनात आपला शोधप्रबंध तीन वर्षात यशस्वीपणे पूर्ण केला.
'महाज्योती'च्या नागपूरच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी संस्थेचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांच्या हस्ते डॉ. गजानन नाईक यांना मेडल आणि सन्मान वस्त्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेखाधिकारी रश्मी तेलेवार यांची उपस्थिती होती.
डॉ. गजानन नाईक यांचा दर्जेदार वाण तयार करणारा शोधप्रबंध
* डॉ. नाईक यांनी पिवळी ज्वारी या पिकामध्ये अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता तयार करण्याचे वाण यावर शोधप्रबंध तयार केला. या प्रयोगासाठी त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या साहाय्याने किरणोत्सार तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिवळ्या ज्वारीमध्ये जनुकीय बदल घडविले.
* या बदलातून अधिक उत्पादनक्षम, दुष्काळसदृश परिस्थितीत तग धरू शकणारे आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असलेले काही प्रोजेनीस शोधले आहेत.
* यामधून भविष्यात पिवळ्या ज्वारीचा अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असणारा वाण विकसित होईल. तसेच शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल, असे मनोगत डॉ. नाईक यांनी व्यक्त केले.
महाज्योतीचे संशोधक डॉ. गजानन नाईक यांनी केलेले संशोधन कौतुकास्पद असून आपल्या कृषिप्रधान असलेल्या भारताला प्रगतिपथावर नक्की नेणारा ठरेल. - अतुल सावे, महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री.