महाराष्ट्रात तसेच देशातील काही राज्यात यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असून सध्य परिस्थितीत कमी ओलाव्यावर रब्बी पिकाचे नियोजन करणे गरजेचे असून जमिनीतील ओलावा टिकवून पुढीलप्रमाणे उपाय योजना केल्यास निश्चितच गव्हाचे चांगले उत्पादन मिळविता येऊ शकते.
महाराष्ट्रात रब्बी हंगामात गहू लागवडीखाली जवळपास ११ ते १२ लाख हेक्टर क्षेत्र असते मात्र पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा परिस्थितीत गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते.
जमीनगहु पिकासाठी भारी व खोल जमिनीची निवड करावी. एक किंवा दोन पाणी उपलब्ध असल्यास गव्हाची लागवड जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीतच करावी. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.
पेरणीची वेळजमिनीतील उर्वरित/उपलब्ध ओलाव्यावर (कोरडवाहू) गव्हाची पेरणी १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान करावी तर संरक्षित पाण्याखाली घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान करावी.
मशागतजमिनीची मशागत करताना खरीप पिक जर सोयाबीन किंवा गळीत धान्य असेल तर एकच कुळवणी करावी व कुळवणीच्या अगोदर चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पुर्वीच्या पिकाची धसकटे इतर काडी कचरा वेचून त्याचा वापर कंपोस्टसाठी करावा.
बियाणेसंरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
बीजप्रक्रियापेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ७५ टक्के डब्ल्यु. एस. या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे तसेच थायोमेथोक्झॅम ७० टक्के विद्राव्य भुकटी या कीटकनाशकाची १.७५ ग्रॅ. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. जीवाणू खतांच्या बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.*जैविक बुरशीनाशक म्हणून थायरम ऐवजी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
पेरणीपेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत २० सं.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करुन चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेवून गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.
रासायनिक खतेगहू पिकासाठी रासायनिक खतांच्या मात्रा खालील प्रमाणे शिफारस केलेल्या आहेत.
पेरणीची वेळ | नत्र (किलो/हेक्टर) | स्फुरद (किलो/हेक्टर) | पालाश (किलो/हेक्टर) |
जिरायत पेरणी | ४० | २० | ०० |
मर्यादित सिंचन पेरणी | ८० | ४० | ४० |
जिरायत पेरणी करताना नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळेस द्यावे.
अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीत कमी पाण्यात अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर करून खालीलप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.१) गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.२) गहू पिकास दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्याव.३) गहू पिकास तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.४) गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते आणि दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते.
पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते.संवेदनशील अवस्था पेरणी नंतरचे दिवसमुकुटमुळे फुटण्याची अवस्था १८-२१कांडी धरण्याची अवस्था ४५-५०फुलोरा अवस्था ६०-६५दाण्यात दुधाळ अवस्था ८०-८५दाणे भरण्याची अवस्था ९०-१००
आंतरमशागतपेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेवून एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. जरुरी प्रमाणे १-२ कोळपणी करून जमीन मोकळी करावी त्यामुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जिरायती गव्हामध्ये जमिनीवर आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होवून जमिनीत ओलावा जास्त टिकून राहतो.
कीड नियंत्रणगहू या पिकास मावा, खोडमाशी व खोडकिडा यांचेपासून नुकसान पोहोचते. मावा कीड दिसून येताच मेटारायझियम ॲनिसाप्ली ३० ग्रॅम किंवा बिव्हेरिया बॅसियाना ५० ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही ८ मिली किंवा थायमेथोझॅम २५ टक्के विद्राव्य दाणेदार १ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून गरजेप्रमाणे १५ दिवसांचे अंतराने एक किंवा दोन फवारण्या कराव्यात.
कापणी व मळणीपीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीच्या वेळी दाण्याती ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापणी व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी.
डॉ. सुरेश दोडके, डॉ. योगेश पाटील आणि प्रा. संजय चितोडकरकृषि संशोधन केंद्र, निफाड जिल्हा, नाशिक