चांगल्या पावसाचा अंदाज ऐकून अनेक शेतकरी कापूस लागवड करण्याची तयारी करत आहेत. मात्र सध्याचे वातावरण लागवडीसाठी योग्य नसल्याचे कृषी तज्ज्ञांची सांगितले आहे. वाढत्या तापमानामुळे शेतात पेरणी करू नका, कपाशी पिकाची लागवड (cotton cultivation in June) केल्यास त्याची उगवण होणार नाही. यासाठी १ जूननंतरच कापसाची लागवड करावी, असा सल्ला तळोदा कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
वातावरणातील बदलामुळे कमालीचे तापमान वाढले आहे. तळोदा तालुक्यात चाळिशी पार तापमान पोहचले आहे. अशा उष्ण वातावरणात कापसाची लागवड केल्यास बियाणे जमिनीत टिकणार नाही. यामुळे थोडे थंड वातावरण होऊ द्या मगच कपाशी पिकाची लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तळोदा तालुक्यातील कोणी कृषी सेवा केंद्रचालक अधिक दराने कापूस बियाण्याचे पाकीट विक्री करत असेल तर त्याची तक्रार कृषी विभागात करा. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्यानंतर कृषी केंद्रातून बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्यावे. जर कृषी सेवा केंद्रचालक पक्के बिल देत नसेल तर ते कापूस बियाणे घेऊ नका, असे देखील कृषी विभागाद्वारे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी यांनी आवाहन केले आहे.
आजच्या घडीला वाढलेल्या तापमानाचा फटका शेती पिकांना बसण्याचा धोका आहे. यामुळे कपाशीची लागवड करू नका. वातावरणात काही प्रमाणात आर्द्रता निर्माण झाल्यानंतर किंवा १ जूननंतरच कपाशीची लागवड करावी. - मीनाक्षी वळवी, तालुका कृषी अधिकारी, तळोदा