नाशिकच्या गंगापूर धरणालगतच्या भागात २५,००० वृक्षरोपण करण्यात आले आहे. या वृक्षारोपणात प्रामुख्याने भारतीय प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यावरणसंवर्धन प्रभावीपणे होणार आहे.
आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुलाने हा उपक्रम नुकताच राबविला आहे. यापूर्वीही त्यांनी हजारो वृक्षारोपण करून त्यांना जगविले आहे. या सर्व लागवड केलेल्या रोपांचे संवर्धन आणि देखभाल सुला विनयार्डस यांच्या सामाजिक बांधिलकी (CSR) उपक्रमातून आणि सावरगांव-गंगावऱ्हे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने केली जाणार आहे.
दरम्यान रौप्य महोत्सवी वृक्षारोपण उपक्रमाबाबत सुलाचे संस्थापक राजीव सामंत म्हणाले कि, आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी वचनबद्ध आहोत. दरवर्षी आम्ही वृक्षारोपण मोहीम राबवत असतो. या पूर्वी आम्ही वासळी गावाजवळील डोंगरावर १८,००० झाडांची लागवड केली. तसेच सुलाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरावर १०,००० झाडांची लागवड केलेली आहे. या व्यतिरिक्त जऊळके वणी रस्त्यावर तसेच गंगापूर सावरगाव मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण केलेले आहे . यावर्षी आमच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २५,०००हून अधिक झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट घेऊन ते यशस्वीरीत्या पूर्ण केले.
या उपक्रमासाठी सप्तपर्णी, कांचन, बेहडा, कदंब, वड, आंबा , चिक्कू, सीताफळ, रामफळ, हिरडा, जांभूळ, महोगनी, पिंपळ आणि चिंच अशा भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड केली आहे. जेणेकरून गंगापूर धरण आणि सभोवतालच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी उपयोग होईल.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमात सुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण वसानी, गंगाव्हरे सावरगाव ग्रुप गामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच लक्ष्मणराव बेंडकुळे, उपसरपंच रुंजा धोंगडे, वरिष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे, वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव पैठणकर, महाव्यवस्थापक अमित कुलकर्णी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती. या वृक्षारोपणाच्या यशस्वीतेसाठी जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि गंगाव्हरे सावरगांव ग्रुप ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.