Join us

जांभूळ लागवड करताय? जेवढे पैसे मिळतात तेवढेच आहेत धोके! जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 7:21 PM

जांभूळ शेतीमध्ये जेवढा पैसा आहे तेवढाच धोका या शेतीमध्ये आहे.

पुणे : पारंपारिक शेतीला फाटा देऊन शेतकरी नगदी पिकांची आणि फळपिकांची लागवड करत असतात. पण काही फळबागांमध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढेच धोके शेतकऱ्यांना पत्करावे लागतात. ज्याप्रकारे डाळिंब आणि द्राक्ष शेतीमध्ये जास्त धोके आहेत त्याचप्रकारे जांभूळ शेतीमध्येही धोके आहेत. हे धोके नव्याने लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजे. 

दरम्यान,  जांभळाचे आरोग्यास अनेक फायदे असल्यामुळे दिवसेंदिवस जांभळाची बाजारातील मागणी वाढताना दिसत आहे. तर मार्केटमध्ये आणि थेट ग्राहकांना विक्री केले तरीही जांभळांना चांगला दर मिळताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी जांभळाची शेती करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. राज्यात जांभळाचे खूप कमी क्षेत्र आहे. 

जांभळाचे दर किती?जांभळाचे आरोग्यास फायदे असल्यामुळे जांभळांना चांगला दर मिळतो. जर आपण प्रोसेस करण्यासाठी कंपनीला दिले तर किमान ८० रूपये किलोप्रमाणे जांभळांची विक्री केली जाते. तर आपण थेट ग्राहकांना जांभळांची विक्री केली तर ३०० ते ३५० रूपये किलोप्रमाणे विक्री होते. थेट ग्राहकांना विक्री करून अनेक शेतकरी ४०० रूपये किलोपर्यंत दर मिळवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला एका एकरात दरवर्षी ५ ते १० लाखांचे उत्पन्न मिळताना दिसत आहे.

जांभूळ शेतीतील धोकेलागवड करताना जांभळाच्या रोपांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जांभूळ लागवड केली तर साधारण एकसालाआड फळधारणा होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांचा आहे. जांभळाची फळधारणा मे ते जून महिन्यामध्ये होत असल्यामुळे या शेतीला पावसाचा धोका असतो.

बदलते हवामान आणि पाऊसफळांची तोड सुरू असताना पाऊस आला तर झाडावरील पिकलेले पूर्ण जांभळे खाली पडून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. तर पावसामुळे जांभळाला तडे जाणे, बुरशी लागणे असे प्रकार होतात. जर जांभळाला माशीने डंख मारला तर फळ सडते. यामुळे झाडावरील जवळपास ४० टक्क्यापर्यंत माल खराब होऊ शकतो.

विक्री व्यवस्थाज्या शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येते अशा शेतकऱ्यांना जांभूळ शेतीमधून चांगला नफा कमावता येऊ शकतो. पण ज्या शेतकऱ्यांना ग्राहक शोधता येत नाहीत त्यांना बाजार समित्यांमध्ये आणि विविध प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना कमी दरात माल विकावा लागतो.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीलागवड, मशागत