पंतप्रधान पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात निघत आहे. खरीप आणि रब्बी मिळून राज्यातील सुमारे ८५ हजार शेतकऱ्यांना हजार रुपयांपेक्षाही कमी विमा नुकसानभरपाई मिळणार होती. मात्र आता ही रक्कम किमान हजार रुपये केली जाणार आहे.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांना किमान हजार रुपये तरी नुकसान भरपाईचे मिळावे यासाठी शासनाने पुढाकार घेऊन फरकापोटीची रक्कम विमा कंपन्यांना अदा करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यात किमान हजार रुपये राऊंड फिगर येण्याची शक्यता असून त्यांचा रोष करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान पीक विम्याच्या भरपाईची ही हजारभर रुपयांची रक्कम मिळण्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी हे मागच्या वर्षीचे विमाधारक असून सन २०२२-२३चा खरिप आणि २०२२-२३चा रब्बी हंगामातल्या नुकसानभरपाईसाठी सरकारचे हे खास प्रयत्न सुरू आहेत.
खरीपासाठी ७५११६, तर रब्बीसाठी ९२४४ असे मिळून २०२२-२३ वर्षासाठी एकूण ८४ हजार ३६० शेतकऱ्यांना हजारभर रुपयांचा लाभ विमा नुकसान वर्षाच्या दुसऱ्या वर्षी कंपन्यांमार्फत मिळू शकतो.
दरम्यान कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या संदर्भ क्र. (४) च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार “प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान" योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना- खरीप हंगाम २०२२ करीता रु. २ कोटी,९३ लाख ९९,३१६/- इतकी रक्कम तर प्रधानमंत्री पीक विमा योजना-रब्बी हंगाम २०२२-२३ करीता रु.४७,५२,२६७/- इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार ती शेतकऱ्यांना देण्यासाठी म्हणून संबंधित विमा कंपन्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत.