PM FME :
बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः चा उद्योग, व्यवसाय सुरू करून नोकरी देणारे बनावे, यासाठी कृषी विभाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवित आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा ३ वर्षांपासून देशात आघाडीवर आहे.
या योजनेमुळे हजारोंना रोजगार उपलब्ध झाला आहे. या योजनेला २०२१-२२ पासून सुरुवात झाली. तेव्हा एक जिल्हा एक उत्पादन यानुसार अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अनुदान जाहीर झाले.
अशी झाली उद्योग निर्मिती
२०२१-२२ मध्ये १०७ उद्योग उभारून देशात जिल्हा प्रथम आला. २०२२-२३ मध्ये २२२ उद्योगांचे उद्दिष्ट होते. मात्र, जिल्ह्याने ७६१ उद्योग उभारून सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला, २०२३-२४ मध्ये ६२५ चे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ७६६ उद्योग उभारण्यात आले. यातील ९० टक्के उद्योग ग्रामीण भागात होते.
सोलार ड्रायरमध्ये कांदा, टोमॅटो, पालेभाज्या सुकवणारे उद्योग दीड हजारावर आहेत. यातून महिलांना 'ऑफ सिझन' रोजगार मिळाल्याचे कृषी उपसंचालक दीपक गवळी यांनी सांगितले.
१० लाखांपर्यंत मिळते अनुदान
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांना ३५ टक्के रक्कम
अनुदान स्वरूपात शासनाकडून देण्यात येते. अनुदान जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात १८४० सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
मागील तीन वर्षात जिल्ह्यात एकूण १८४० सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात आले आहेत. यात मसाले उद्योग, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे,
बेकरी उत्पादन, दाल मिल, फळांचा ज्यूस बनवणे, आवळा प्रक्रिया उद्योग, मका प्रक्रिया उद्योग, तेल घाणा, आलू चिप्स बनवणे, सोया प्रॉडक्ट कारखान्यांचा यात समावेश आहे.