पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा १४वा हप्ता २७ जुलैला जमा केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील ८५ लाख ५२ हजारांहून अधिक शेतकरी पात्र ठरले आहेत. १३वा हप्ता मार्चमध्ये जमा करण्यात आला होता.
आधार संलग्न करणे, डीबीटीचे बँक खाते अनिवार्य करणे, ई-केवायसी अशा अटींची पूर्तता केल्यामुळे गेल्या हप्त्याच्या तुलनेत राज्यात यावेळी सुमारे अडीच लाख शेतकरी वाढले आहेत. पीएम किसान योजनेतील दोन हजारांच्या हप्त्यानुसारच राज्याने जाहीर केलेल्या 'नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळेल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र,अद्याप त्याबाबत हालचाली दिसत नाहीत.
१४वा हप्ता २७ जुलैला
पीएम किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता २७ मार्च रोजी देण्यात आला होता. त्यानंतर आता १४वा हप्ता २७ जुलैला देण्याचे ठरले आहे. त्यानुसार राज्यातील ८५ लाख ५२ हजार २८१ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यात आणखी सुमारे ३० हजार ७४२ शेतकऱ्यांची यादी मान्यतेसाठी आला आहे. या शेतकऱ्यांना मान्यता दिल्यास एकूण पात्र शेतकऱ्यांची संख्या ८५ लाख ८३ हजार इतकी होईल. राज्यात ९९ लाख २० हजार ८६० शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ९७ लाख ८२ हजार ७७७ शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण केली आहे, तर आधार जोडणीसह जमीन पडताळणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ७७ लाख सात हजार ७७७ इतकी आहे. ई-केवायसी बंधनकारक केल्यानंतरही ८५ लाख ३५ हजार २६४ शेतकऱ्यांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे. राज्यात अजूनही १३ लाख ८५ हजार ५९६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.
'नमो किसान'ला निधीच्या तरतुदीची अपेक्षा
'पीएम किसान सन्मान योजने'च्या धर्तीवरच राज्य सरकारनेही सहा हजार रुपयांचा 'नमो किसान सन्मान' निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सध्या सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही यासाठी चार हजार कोटी रुपयांची पुरवणी मागण्यांतून तरतूद केली आहे. त्यावर या आठवड्यात चर्चा होऊन त्याला विधिमंडळाची मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच ही रक्कम या योजनेसाठी राखीव ठेवली जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच हा हप्ता मिळेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरची निर्मिती सुरु असून, रकमेच्या तरतुदीनंतरच हा हप्ता मिळेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासाठी मात्र, किती काळ लागेल हे सांगणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.
या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार नाही
तुम्ही जरी अल्प किंवा अल्पभूधारक शेतकरी असाल, परंतु कुटुंबातील एखाद्या सदस्याने कर भरला असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. येथे कुटुंबातील सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले. याशिवाय ज्यांच्याकडे लागवडीयोग्य जमीन नाही, ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन आहे परंतु तिचा मालक सरकारी कर्मचारी आहे किंवा शेतकऱ्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळते, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
अशी करा ई-केवायसी प्रक्रिया
- https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- आता किसान कॉर्नर पर्यायावर eKYC लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर येथे विचारलेली आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
- यानंतर सबमिट वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण होईल.
याप्रमाणे तुमची स्थिती तपासा
- सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
- आता ‘फार्मर्स कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
- आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.
- त्यानंतर ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.
- शेतकरी या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.