Pune : केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १८ वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा ५ वा हप्ता आज राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दसऱ्याच्या आधी ४ हजार रूपये मिळाले आहे. आज वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी वितरीत करण्यात आला.
दरम्यान, निवडणुकांना समोर ठेवून राज्य सरकारने शेतकऱ्यांचे प्रलिंबित अनुदान, पीक विमा, नुकसान भरपाई, लाडकी बहीण योजना, गायींना अनुदान, दूध अनुदान, पीक कर्जावरील व्याजमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीजबील, दिवसा वीज अशा अनेक घोषणा आणि निधी वाटप केला आहे.
त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता आचारसंहितेच्या आधीच देण्याची तयारी सुरू आहे. यातच आता पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचाही हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने २०१९ साली शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३ हप्त्यात सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो. या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने दोन वर्षापूर्वी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून, राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांचे ६ हजार रुपये दिले जातात.
ज्य आणि केंद्राच्या दोन्ही योजनांचे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीमधील हफ्ते शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.