केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. मात्र, याच योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
या योजनेचे खाते अपडेट करा, म्हणून लिंकचा मेसेज येतो, आणि शेतकऱ्यांच्या बँकेचे खातेच रिकामे होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दररोज प्राप्त होत आहेत. त्यामुळे या फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियातून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली आपले खाते अपडेट करा, आपला पंतप्रधान सन्मान निधी जमा झाला का तपासा.
तुमचा अडकलेला हप्ता मिळवा, अशा एक ना अनेक प्रकारच्या मेसेजमधून अशी एक एपीके लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये अप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर मोबाइल आणि सीमकार्ड हॅक होऊन बंद पडते. अशा प्रकारे फसवणूक केली जाते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फसव्या लिंकपासून वेळीच सावध व्हावे, कोणतेही मेसेज आणि लिंक आल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकारे भविष्यात फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनीही सावध होऊन कोणत्याही योजनेच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये.
ई-केवायसीच्या नावे फसवणूक
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणताही कॉल, मेसेज किंवा कोणतीही अनोळखी लिंक आली असेल तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका, अन्यथा फसवणूक करणारे तुमची फसवणूक करू शकतात.
गुन्हा दाखल करण्यास मनाई
पीएम किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहेत. मात्र, काहींनी गुन्हा दाखल करण्यास मनाई केली, तर काहींची किरकोळ स्वरुपात रक्कमही गेल्याने त्यांनी तक्रार देण्यास टाळले. मात्र, ही फसवणूक सध्या वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
अधिक वाचा: E Pik Pahani : ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती कशी भरायची?