सचिन काकडेसातारा : गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर 'पीएम किसान' योजनेचा एक मेसेज सातत्याने येऊन धडकत आहे. या मेसेजसोबत एक 'अॅप'देखील जोडले गेले आहे.
मेसेजच्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करण्याची विनंती केली जात आहे. जर तुम्हालादेखील असा मेसेज आला असेल, तर 'अॅप' डाऊनलोड करण्याचे धाडस करू नका. असे केल्यास तुमचा मोबाइल भामट्यांकडून हॅक होऊ शकतो.
अलीकडच्या एक-दोन वर्षांत ऑनलाइन गंडा घालणे, सोशल मीडियावरील आपले अकाऊंट हॅक करणे, अशा घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या सायबर शाखेने ठोस पावले उचलली असून, नागरिकांमध्ये वारंवार जनजागृती केली जात आहे.
याचे चांगले परिणाम आता दिसू लागले असून, नागरिकही अधिक सतर्क काही झाले आहेत. तरीदेखील नागरिक मोबाइलवर येणाऱ्या मेसेजेसला बळी पडून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशाच एका मेसेजमुळे सातारकर हैराण झाले आहेत. हा मेसेज हिंदी भाषेत असून, त्यावर 'पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी सुरू असून, मोबाइल नंबर, पत्ता बदलणे व अन्य कामासाठी हे अॅप डाऊनलोड करा' असे सांगण्यात आले आहे.
काही नागरिकांनी जेव्हा हे अॅप डाऊनलोड केले, तेव्हा त्यांचा मोबाइल पूर्णतः हँग झाला. असाच अनुभव अनेकांना आला असून, हा प्रकार नेमका आहे तरी काय? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडे बहुतांश नागरिक मोबाइल वॉलेटचाच वापर करतात. मोबाइल गॅलरीत आपले महत्त्वाचे दस्तऐवज व फोटोदेखील असतात. अशा फसव्या मेसेजेसला बळी पडून भामट्यांकडून आपला मोबाइल हॅक केला जाऊ शकतो व आपले बैंक खातेदेखील रिकामे होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी असे कोणतेही अॅप डाऊनलोड करण्याचे धाडस करू नये. - अजय जाधव, सायबर तज्ज्ञ