पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर अटींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई- केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्यासाठी १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचे कृषी विभागाने ठरवले आहे.
त्यासाठी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे शेतकरी १६ व्या हप्त्यासाठी पात्र ठरवावेत, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्यानंतर कृषी विभागाची धावपळ सुरू आहे.
किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश गेडाम यांनी दिले आहेत. या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे.
अधिक वाचा: 'आयटीआर'मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा 'सन्मान'; पीएम किसान निधीचा मिळणार फायदा
कधी मिळेल १६ वा हप्ता
राज्यभरात प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोठी असून, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वसुलीची रक्कम मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. दुसरीकडे, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार होता. मात्र, काही कारणास्तव तो आता महिनाअखेरीस देण्यात येणार आहे.
यापूर्वी ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या ४५ दिवसांच्या मोहिमेदरम्यान राज्यात १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, तसेच ३ लाख १ हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. - दिलीप झेंडे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण