Join us

PM Kisan Samman Nidhi पी एम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 11:05 AM

योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २,०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६,०००/- लाभ अदा करण्यात येत आहे.

लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील ९०.२० लाख लाभार्थ्यांनी केलेली आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक ०५ जून, २०२४ ते १५ जून, २०२४ या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व e-KYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी.

यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (Land Seeding - No) लाभार्थींनी संबंधित तलाठी/तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे eKYC व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मार्फत कार्यपूर्तता करावी. 

पी.एम.किसान योजनेचा १७ वा हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे.

योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. 

अधिक वाचा: Paddy Sowing धान लागवडीसाठी किती बियाणे लागते व कशी करावी बीजप्रक्रिया

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीशेतीसरकारराज्य सरकारकेंद्र सरकारपीक