पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता महिनाअखेर देण्याचे नियोजन असून, राज्यात आतापर्यंत ९० लाख २० हजार शेतकऱ्यांनी अटींची पूर्तता केली आहे. मात्र, अजूनही सुमारे एका लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी e-KYC केलेले नाही.
तर काही शेतकऱ्यांनी लागवडीलायक क्षेत्र निश्चित करणे, तसेच बँक खाती आधार संलग्न केले नसल्याने कृषी विभागाने आता ५ ते १५ जून या १० दिवसात गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारनेप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यांत प्रतिवर्षी ६ हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.
त्यासाठी शेतकऱ्यांना लागवडीलायक क्षेत्राची भूमी अभिलेख विभागाकडून निश्चिती करणे, बँक खाती आधार संलग्न करून घेणे व योजनेचे ई-केवायसी पूर्ण करणे या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. राज्यातील ९० लाख २० हजार शेतकऱ्यांनी या तिन्ही अटींची पूर्तता केली आहे. अजूनही सुमारे एक लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही.
शेतकऱ्यांनी स्वतः बँकेत जाऊन किंवा मोबाइलवर ई-केवायसी पूर्ण केल्यास त्यांनाही या १७ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थीनी संबंधित तलाठी, तहसील कार्यालयात संपर्क साधावा. ई-केवायसी व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी.
पीएम किसान योजनेच्या १७ वा हप्त्याचा लाभ जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बैंक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता १७ व्या हप्त्याच्या वितरणापूर्वी स्वतः करून घ्यावी. - विकास पाटील, कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक
अधिक वाचा: Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा